कुस्तीपटू पुनियावर नाडाची बंदी, जाणून घ्या ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या बजरंगची संघर्षमय कहाणी
Bajrang Punia Profile : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियावर नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (NADA) चार वर्षांची बंदी घातली आहे. आता पुनिया यापुढे चार वर्षे कोणत्याही स्पर्धात्मक कुस्तीमध्ये भाग घेऊ शकणार नाही किंवा तो कोणत्याही परदेशी खेळाडूचा कोच म्हणून भूमिकाही बजावू शकणार नाही.
राष्ट्रीय संघाच्या निवड चाचणीदरम्यान पुनियाने डोप चाचणी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर नाडाने पुनियावर बंदी घातल्याने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर लोक आता याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर भारताचा गौरव करणाऱ्या पुनियाचा जन्म 26 फेब्रुवारी 1994 रोजी हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील खुदान गावात झाला. कुस्तीची लहानपणापासूनच आवड असणा-या पुनियाला या खेळासाठी त्यांच्या कुटुंबाने पाठिंबा दिला.

सामान्य कुटुंबात जन्माला आलेले, पण विलक्षण प्रतिभा असलेले पुनियाचे वडील बलवान सिंग जे स्वत: कुस्तीपटू आहेत.त्यांनी आपल्या मुलाला कुस्तीची कला शिकवली. आर्थिक चणचण असतानाही त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. बजरंगने वयाच्या 7 व्या वर्षी कुस्तीला सुरुवात केली.
पुनिया वयाच्या 7 वर्षांपासून खेळतोय कुस्ती
पुनियाचे सुरुवातीचे प्रशिक्षक ज्वाला सिंग होते, त्यानंतर त्याने दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये प्रशिक्षण सुरू केले, जिथे त्याला ऑलिंपिक पदक विजेता योगेश्वर दत्त यांचे मार्गदर्शन मिळाले.
बजरंग पुनियाने कुस्तीपटू संगीता फोगटशी बांधली लगीनगाठ
7 नोव्हेंबर 2020 रोजी संगीता फोगटशी विवाह करणारा पुनिया लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. त्याला अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न आणि पद्मश्री यांसारख्या अनेक पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
पुनियाची प्रमुख कामगिरी खालीलप्रमाणे आहे:
- ऑलिम्पिक पदके: टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक.
- आशियाई खेळ: 2018 मध्ये सुवर्णपदक.
- राष्ट्रकुल खेळ: 2018 आणि 2022 मध्ये सुवर्णपदक.
- जागतिक कुस्ती स्पर्धा:2018 मध्ये रौप्य पदक आणि 2019 मध्ये कांस्य पदक.
2024 मध्ये राजकीय कारकीर्दला सुरवात
पुनियाने 2024 मध्येच आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली आहे. 7 सप्टेंबर 2024 रोजी पुनिया हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सहकारी कुस्तीपटू विनेश फोगटसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 22 ऑक्टोबर 2024 रोजी पुनिया यांनी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.












Click it and Unblock the Notifications