मोहम्मद शमी झाला ट्रोल; शमीच्या 'त्या' कृतीबाबत मौलानांमध्येच मतभेद, वाचा, नेमकं प्रकरण काय?
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत एक नवीन वाद निर्माण झाला आहे. मोहम्मद शमीच्या एका फोटोवरून त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे. खरंतर, त्या फोटोत शमी सामन्यादरम्यान एनर्जी ड्रिंक पिताना दिसत आहे. त्याच फोटोवरुन कट्टरपंथीयांनी त्याला लक्ष्य केल्याचे दिसत आहे. बरेलीतील एका मौलानाने म्हटले आहे की, शमीने रमजानमध्ये उपवास न ठेवून मोठे पाप केले आहे. तथापि, शमीच्या समर्थनार्थ अनेक आवाज उठत आहेत आणि काही मौलानांनी तर त्याचा बचावही केला आहे.

काय म्हणाले होते मौलाना
बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी म्हटले आहे की, शमीने उपवास न ठेवून मोठे पाप केले आहे. मुहम्मद शमी हा शरियाच्या दृष्टीने गुन्हेगार आहे. इस्लाममध्ये उपवास अनिवार्य आहे. शमीचा जो फोटो व्हायरल होत आहे तो दुबईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील आहे. त्या सामन्यात शमीने ३ महत्त्वाच्या विकेट घेतल्या होत्या. सामन्यात जसे इतर प्लेअर्स ड्रिंक पितात, तसे ड्रिंक तो पित होता.
काही मौलानांचा पाठींबा
रमजानमध्ये उपवास न ठेवल्याबद्दल ट्रोल होणाऱ्या मोहम्मद शमीला काही मौलानांकडून पाठिंबा मिळत आहे. दिल्लीच्या मोती मशिदीचे इमाम मौलाना अर्शद यांनी म्हटले आहे की, मोहम्मद शमीला ट्रोल करणाऱ्यांना ना इस्लाम माहित आहे ना कुराण. त्यांनी सांगितले की इस्लाममध्ये प्रवाशाला उपवास करण्यापासून सूट आहे. मौलाना म्हणाले, 'मोहम्मद शमी सध्या भारताबाहेर दौऱ्यावर आहेत, त्यामुळे हे त्याला लागू होते.' उपवासाच्या बाबतीत, फक्त कुराणातील आदेशांचे पालन केले पाहिजे, बरेलीतील मौलाना किंवा इतर कोणाच्याही आदेशांचे पालन करू नये. शमी देशासाठी खेळत आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा पाठिंबा
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननेही क्रिकेटपटू मोहम्मद शमीला पाठिंबा दिला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी शमीचा बचाव केला आहे. संपूर्ण असोसिएशन शमीच्या पाठीशी उभी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, शमी इस्लामचा आदर करतो पण त्याच्यासाठी देश धर्मापेक्षा पुढे आहे. जर शमी सामन्यादरम्यान चांगली कामगिरी करण्यासाठी एनर्जी ड्रिंक्स पीत असेल तर त्यात काहीही गैर नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी खूप महत्त्वाची आहे. जर शमी पूर्णपणे तंदुरुस्त राहीला तरच तो देशासाठी खेळू शकतो.












Click it and Unblock the Notifications