2024 मध्ये T-20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने केला कहर; केव्हा कशी मारली बाजी, घ्या जाणून
LookBack 2024 Sports : वर्ष 2024 आता मावळतीकडे चालले आहे. या वर्षभरात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या तर अनेक वाईट गोष्टी जगभरात घडल्या. दुसरीकडे क्रिकेटविश्वाचा विचार केला तर गेल्या वर्षभरात भारतीय संघाबद्दल अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे भारतीय संघाची टी-20 मधील कामगिरी असेल.
भारतीय संघाने सर्वात लहान फॉरमॅटमध्ये आपले वर्चस्व दाखवले आहे. टी-20 विश्वचषकात टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले आणि प्रदीर्घ कालावधीनंतर ट्रॉफीवर नाव कोरले.

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टीने हे वर्ष भारतासाठी खूप चांगले आहे. टीम इंडियाने जिंकण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आणि फार कमी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आकडेवारीवर नजर टाकल्यास भारतीय संघ या फॉरमॅटमध्ये कायमच वरचढ ठरलेला आहे.
T20 मध्ये भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी 92 टक्क्यांहून अधिक होती. ही कोणत्याही संघाची सर्वाधिक टक्केवारी आहे. 2018 मध्ये पाकिस्तानच्या विजयाची टक्केवारी 89 टक्के होती परंतु टीम इंडियाने या बाबतीत अव्वल स्थान मिळवले.
26 पैकी 24 टी-20 सामन्यात विजय मिळवला
एकूण सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने यावर्षी एकूण 26 टी-20 सामने खेळले आणि 24 जिंकले. भारतीय संघाला केवळ दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाला झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने इतर सर्व संघांविरुद्धचे सामने जिंकले होते.
टी-20 बरोबरच मालिकातही मिळवला विजय
T20 विश्वचषक जिंकणे ही भारतासाठी सर्वात मोठी उपलब्धी आहे, परंतु द्विपक्षीय मालिकेतील कामगिरीही काही कमी नाही. टीम इंडियाने अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, श्रीलंका, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळल्या आणि त्या सर्व जिंकल्या.
टी-20 मध्ये भारताने दबदबा कायम ठेवला
रोहित आणि कोहली निवृत्त झाले आणि सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेत मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेतही जिंकले. याशिवाय त्याच्या नेतृत्वाखाली बांगलादेशला घरच्या मालिकेतही पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाने यंदाही टी-20 मध्ये आपला दबदबा कायम राखला.












Click it and Unblock the Notifications