अश्विन आणि कुंबळे यांच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीमध्ये एक खास योगायोग, जाणून घ्या
Ravichandran Ashwin Retirement: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटीनंतर अश्विनने ही घोषणा केली आहे. मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिल्यानंतर या स्टार खेळाडूने निवृत्ती जाहीर केली. अश्विन आणि अनिल कुंबळे यांच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीमध्ये एक योगायोग आहे.
अश्विन आणि कुंबळे यांच्यातील एक योगायोग
अनिल कुंबळेनंतर 500 हून अधिक कसोटी बळी घेणारा अश्विन दुसरा भारतीय आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 ची तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर तो निवृत्त झाला आहे, त्याची शेवटची विकेट मिचेल मार्शची होती. विशेष योगायोग म्हणजे 2008 ची तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर कुंबळेनेही निवृत्ती स्वीकारली होती, ज्यामध्ये त्याची शेवटची विकेट मिचेल जॉन्सनची होती.

रविचंद्रन अश्विनची क्रिकेट कारकीर्द
रविचंद्रन अश्विनची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. कारण त्याने सर्व फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 38 वर्षीय अश्विनने 287 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 765 विकेट घेतल्या आहेत. तसेच भारतासाठी 100 हून अधिक कसोटी खेळण्याचा अनोखा विक्रम त्याच्या नावावर आहे.
अश्विनच्या नावावर 37 वेळा पाच विकेट घेण्याचा विक्रम
अश्विनने 106 कसोटीत 537 विकेट घेतल्या आहेत. त्यासोबत 3503 धावा केल्या आहेत. त्याने सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये 37 वेळा पाच बळी घेण्याचा विक्रम ही त्याच्या नावावर आहे. तसेच फलंदाजीमध्ये अश्विनचं मोठ योगदान राहिलं आहे. त्याने कसोटीत सहा शतके झळकावली आहेत. कसोटी सामन्यात 350 विकेट्स पूर्ण करणारा अश्विन हा सर्वात जलद खेळाडू ठरला आहे.
अश्विनच्या नावावर वनडेत 156 विकेट्स
अश्विनने टीम इंडियासाठी 116 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 156 विकेट घेतल्या आहेत. 65 टी-20 सामन्यांमध्ये 72 विकेट घेतल्या आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे. तसेच त्याला 11 वेळा मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे, जे कोणत्याही कसोटी खेळाडूसाठी सर्वाधिक आहे. 2011 मध्ये ICC विश्वचषक आणि 2013 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता.












Click it and Unblock the Notifications