'या' बॅडमिंटन स्टारने 30 लिटर 'ब्रेस्ट मिल्क' का केले दान?, तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं?
Jwala Gutta breast milk donation : आईचे दूध हे प्रत्येक नवजात बालकासाठी अमृतासमान असते. मात्र, काही कारणांमुळे अनेक नवजात बालकांना ते मिळत नाही. अशा वेळी दुसऱ्या आईने दान केलेले दूध त्यांच्यासाठी जीवनदान ठरते.
याच भावनेतून, भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने एक अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. तिने 30 लिटर ब्रेस्ट मिल्क दान करून अनेक नवजात बालकांना जीवनदान दिले आहे. तिच्या या कार्यामुळे सध्या सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
ज्वालाने उचलले मानवीतेचे पाऊल
एप्रिल २०२५ मध्ये ज्वाला गुट्टा आणि तिचे पती, अभिनेते-निर्माते विष्णू विशाल, यांच्या घरी कन्यारत्न 'मीरा' हिचा जन्म झाला. या आनंददायी क्षणांनंतर ज्वालाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तिने सरकारी रुग्णालयात जाऊन आईचे दूध दान करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तिने जवळपास ३० लिटर दूध दान केले आहे. तिचे हे दूध ज्या मातांना पुरेसे दूध येत नाही किंवा अकाली जन्मलेल्या बाळांसाठी वरदान ठरले आहे.
ज्वालाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याविषयी माहिती देताना म्हटले की, "स्तनपान जीव वाचवते. अकाली किंवा आजारी बाळांसाठी हे एक वरदान आहे." ज्वालाच्या या कृतीमुळे सामाजिक जाणीव वाढली आहे आणि तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आमिर खानने बजावली महत्त्वाची भूमिका
ज्वालाच्या आयुष्यातील या प्रवासात बॉलीवूड सुपरस्टार आमिर खाननेही महत्त्वाची भूमिका बजावली. विष्णू विशालने एका मुलाखतीत खुलासा केला की, आयव्हीएफ (IVF) उपचारादरम्यान ज्वालाला अनेक अपयश आले आणि ती निराश झाली होती. तेव्हा आमिर खान तिच्या मदतीला धावला.
आमिरने ज्वालाला मुंबईला बोलावले, चांगल्या डॉक्टरांची ओळख करून दिली आणि जवळपास 10 महिने तिला त्याच्या घरी राहण्याची सोय केली.
विष्णू म्हणाला की, "जर आमिर सर नसते तर मीराचा जन्म शक्य झाला नसता." याच कारणामुळे, त्यांच्या मुलीचे नाव 'मीरा' ठेवण्याचा मान आमिर खानला देण्यात आला. ही गोष्ट दाखवते की, एका लहानशा मदतीने एखाद्याचे आयुष्य कसे बदलू शकते.
ज्वाला गुट्टा: एक यशस्वी बॅडमिंटनपटू
ज्वाला गुट्टा केवळ एक दानशूर व्यक्तीच नाही, तर बॅडमिंटनच्या दुहेरी प्रकारातील एक यशस्वी खेळाडू आहे. तिने 2010 आणि 2014 च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये पदके जिंकली, ज्यात 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकाचाही समावेश आहे.
तसेच, 2011 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकले होते. तिच्या या यशस्वी कारकिर्दीसोबतच, तिने केलेली ही सामाजिक कामगिरी तिला खऱ्या अर्थाने एक महान व्यक्ती बनवते.












Click it and Unblock the Notifications