Ishan Kishan : मैदानात पाक गोलंदाजांची धुलाई, तर घरी 'लग्नाची' चर्चा; कोण आहे इशान किशनच्या मनात?
Ishan Kishan T20 World Cup form : भारताचा स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन सध्या स्वप्नवत फॉर्ममध्ये आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये त्याने आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी संघांच्या नाकीनऊ आणले आहेत. आज १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात इशानने ४० चेंडूत धडाकेबाज ७७ धावा कुटून भारताचा डाव सावरला. मात्र, एकीकडे इशान मैदान गाजवत असतानाच दुसरीकडे त्याच्या खासगी आयुष्याबद्दलच्या एका बातमीने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.

कोण आहे 'ती' मॉडेल? आजोबांनीच केला गौप्यस्फोट
गेल्या काही काळापासून इशान किशनच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या, मात्र आता खुद्द त्याच्या कुटुंबानेच यावर आपली पसंती दर्शवली आहे. इशानचे आजोबा अनुराग पांडे यांनी एका मुलाखतीदरम्यान इशानच्या आयुष्यातील त्या 'विशेष' व्यक्तीबद्दल भाष्य केले आहे. त्यांचे नाव आहे आदिती हुंडिया.
आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिती ही जयपूरची रहिवासी असून ती व्यवसायाने एक प्रसिद्ध मॉडेल आहे. विशेष म्हणजे तिने 'मिस इंडिया' स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले आहे. आदिती आणि इशान अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत, परंतु आजोबांच्या विधानामुळे या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
"अंतिम निर्णय नातवाचाच!" - कुटुंबाचा पाठिंबा
इशानच्या लग्नाबद्दल विचारले असता अनुराग पांडे यांनी अत्यंत खिलाडूवृत्तीने उत्तर दिले. ते म्हणाले, "इशान जिच्याशी लग्न करेल त्याला आमची पूर्ण संमती असेल. मुलांचा आनंद आमच्यासाठी सर्वोपरी आहे. अंतिम निर्णय इशानचाच असेल आणि आम्ही सर्वजण त्याच्या निर्णयासोबत खंबीरपणे उभे आहोत."
आजोबांनी सांगितला 'तो' मजेशीर किस्सा
एएनआय (ANI) वृत्तसंस्थेशी बोलताना आजोबांनी एक मजेशीर किस्सा शेअर केला. आदितीने एकदा अनुराग पांडे यांची टीव्हीवरील मुलाखत पाहिली होती. त्यानंतर तिने इशानला गमतीने म्हटले होते की, "तुझे आजोबा आजही खूप देखणे दिसतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आहे!" हा किस्सा सांगताना आजोबांच्या चेहऱ्यावरही हासू होते. यावरून इशानचे कुटुंबीय आणि आदिती यांच्यात किती खेळीमेळीचे संबंध आहेत, याची प्रचिती येते.
क्रिकेट की लग्न? इशानची पुढची खेळी काय?
इशान किशन सध्या टीम इंडियाचा 'पोस्टर बॉय' बनला आहे. मैदानावर त्याची आक्रमक फलंदाजी चाहत्यांना वेड लावते, तर मैदानाबाहेर त्याच्या 'लव्ह लाईफ'ची चर्चा होत असते. इशान सध्या विश्वचषकात व्यस्त असल्याने त्याने यावर अधिकृत भाष्य केलेले नाही. मात्र, कुटुंबाने ग्रीन सिग्नल दिल्यामुळे आता इशान त्याच्या आयुष्याची 'दुसरी इनिंग' कधी सुरू करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications