लखनौचा 'जोर का झटका', मिचेल मार्शऐवजी हिम्मत सिंगला संधी; कोण आहे हिम्मत सिंग? का होतेय चर्चा?
सध्या आयपीएल-२०२५ ची सर्वाधिक चर्चा सुरु आहे. रोज या सामन्यांतील खेळाडूंची चर्चा सुरु असते. आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांत अनेक नव्या खेळाडूंनी लक्ष्य वेधले आहे. आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात मॅच होत आहे. गुजरात टायटन्स फलंदाजी करत आहे. परंतु ही मॅच सुरु होण्यापूर्वी क्रिकेट रसिकांना एक धक्का बसला. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेकीच्या वेळी धक्कादायक निर्णय घेतला. त्यांच्या संघाचा स्टार प्लेअर मिचेल मार्श प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. संपूर्ण स्पर्धेत मार्श एलएसजीचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून पुढे आला. मात्र, तो आज संघात नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्याच्या ऐवजी संघात दिल्लीच्या हिम्मत सिंग या २८ वर्षीय खेळाडूला संघात स्थान देण्यात आले.

मिचेल मार्श का नाही?
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मिचेल मार्शने लखनौकडून खेळताना आपल्या नावाला साजेसा खेळ केला आहे. त्याने आत्तापर्यंत पाच डावांत चार अर्धशतके ठोकली आहेत. आत्तापर्यंत एकाच सामन्यांत तो शुन्यावर बाद झाला. परंतु सध्या त्याची मुलगी आजारी आहे. आपल्या मुलीला भेटण्यासाठी तो मायदेशात परतला आहे. आजच्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यांत तो मुलीला भेटायला गेल्यामुळे खेळू शकला नाही.
कोण आहे हिम्मत सिंग?
आजच्या सामन्यांत लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने हिम्मत सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करून एक धाडसी निर्णय घेतला . हिम्मत सिंग हा दिल्लीचा खेळाडू आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो. तो उत्कृष्ट फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजीही करू शकतो. दिल्लीच्या स्थानिक संघासाठी त्याने अनेकदा महत्त्वपूर्ण खेळ्या केल्या आहेत. एलएसजी संघाने हिम्मतला 30 लाखांमध्ये करारबद्ध केले आहे. गेल्या हंगामात दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्या आवृत्तीत ईस्ट दिल्ली रायडर्सच्या विजयातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
कसा खेळलाय हिम्मत सिंग?
हिम्मत सिंगने ५५ टी-२० सामन्यांमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने १३३ च्या स्ट्राईक रेटने ९१७ धावा केल्या आहेत. २०२४ च्या भारतातील प्रमुख घरगुती टी-२० स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या आवृत्तीत त्याने ८ डावांमध्ये १४८ च्या स्ट्राईक रेटने १९७ धावा केल्या आहेत. त्याने दिल्ली प्रीमियर लीगमध्येही १० डावांमध्ये ३८१ धावा केल्या आहेत, फक्त प्रियांश आर्य आणि आयुष बदोनी यांच्या मागे आहे. प्रियांश आर्यने आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जकडून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शतक ठोकून आधीच मोठी कामगिरी केली आहे.
एलएसजी प्लेईंग इलेव्हन
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन: एडन मार्कराम, हिम्मत सिंग, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅन्डर आणि wk), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, दिग्वेश सिंग राठी, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, आवेश खान, रवी बिश्नोई












Click it and Unblock the Notifications