स्मृती मानधनाचा ऐतिहासिक विक्रम: सर्वात जलद 5000 वन-डे धावा पूर्ण, 52 वर्षांचा विश्वविक्रम मोडला!
Women World Cup 2025 : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटमध्ये एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करत इतिहास रचला आहे.
तिने एकदिवसीय सामन्यांमध्ये ५,००० धावा पूर्ण करण्याचा टप्पा सर्वात जलद गाठणारी महिला क्रिकेटपटू बनण्याचा मान मिळवला आहे.
स्मृती मानधनाने अवघ्या ११२ डावांमध्ये ५,००० धावा पूर्ण केल्या. या कामगिरीसह तिने वेस्ट इंडिजची दिग्गज खेळाडू स्टेफनी टेलर हिचा विक्रम मोडून काढला आहे.
हा टप्पा गाठणारी ती जगातील पाचवी महिला क्रिकेटपटू ठरली आहे आणि भारताची महान खेळाडू मिताली राज नंतर ५,००० धावा पूर्ण करणारी ती दुसरी भारतीय खेळाडू बनली आहे.

चेंडूंच्या बाबतीतही रचला विक्रम
स्मृती मानधनाने केवळ डावांच्या बाबतीतच नाही, तर खेळलेल्या चेंडूंच्या बाबतीतही जागतिक विक्रम केला आहे. ६,००० पेक्षा कमी चेंडूंमध्ये ५,००० धावा पूर्ण करणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. मानधनाने ही ऐतिहासिक कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केली.
या सामन्यात तिने शानदार फॉर्ममध्ये परत येत ६६ चेंडूत ८० धावांची धमाकेदार खेळी केली आणि स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक झळकावले. या दरम्यान, तिने तिची सहकारी प्रतिका रावल हिच्यासोबत शतकी भागीदारी केली. मानधनाने २९ वर्षे आणि ८६ दिवसांच्या वयात हा टप्पा गाठला.
एका कॅलेंडर वर्षात १००० धावांचा ५२ वर्षांचा विक्रम मोडला
स्मृती मानधनाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा विश्वविक्रम रचला आहे, जो ५२ वर्षे जुना आहे.
ती एका कॅलेंडर वर्षात १००० एकदिवसीय धावा करणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. महिला क्रिकेटचा पहिला एकदिवसीय सामना १९७३ मध्ये खेळला गेला, तेव्हापासून हा पराक्रम कोणत्याही खेळाडूला करता आला नव्हता.
यापूर्वी, मानधनाने फक्त तीन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडू बेलिंडा क्लार्क (१९९७ मध्ये ९७३ धावा) हिचा एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम मोडला होता. आता तिने स्वतःचाच विक्रम अधिक वाढवला आहे.
उत्कृष्ट फॉर्ममध्ये परतलेल्या स्मृती मानधनाने या दोन मोठ्या विक्रमांसह जागतिक क्रिकेटमध्ये आपले स्थान आणखी मजबूत केले आहे.












Click it and Unblock the Notifications