भारताच्या लेकीने अखेर करून दाखवलं; स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी! 28 वर्षे जुना विश्वविक्रम मोडला
Smriti Mandhana Breaks 28 Year Old World Record : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने जागतिक क्रिकेटमध्ये आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात खेळताना मानधनाने तब्बल २८ वर्षांपासून अबाधित असलेला एक मोठा विश्वविक्रम मोडला आहे.
या विक्रमासह, एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा क्षण अभिमानास्पद असून, विशाखापट्टणमच्या मैदानावर स्मृती मानधनाने इतिहास रचला आहे.

मानधनाचा विश्वविक्रम आणि क्लार्कचा विक्रम मोडीत
स्मृती मानधना (वय २९) हिने ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार आणि महान खेळाडू बेलिंडा क्लार्क यांचा १९९७ साली केलेला विक्रम मोडला. बेलिंडा क्लार्क यांनी १९९७ या कॅलेंडर वर्षात ९७० धावा केल्या होत्या. मानधना जेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजीला आली, तेव्हा तिच्या नावावर ९५९ धावा होत्या. आठव्या षटकात अयाबोंगा खाका हिला षटकार मारून तिने हा आकडा पार केला आणि क्लार्कला मागे टाकले.
केवळ १७ सामन्यांत सुमारे ६० च्या सरासरीने धावा करून मानधनाने १८ व्या सामन्यात हा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला.
बेलिंडा क्लार्कने त्याच १९९७ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक (डेन्मार्कविरुद्ध नाबाद २२९) झळकावले होते. क्लार्कने महिला क्रिकेटमध्ये रचलेला हा पराक्रम मानधनाने आता धावांच्या बाबतीत मोडून काढला आहे.
'जगातील सर्वात यशस्वी' खेळाडूंमध्ये मानधना
मानधनाला जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिच्या सातत्यपूर्ण आणि आकर्षक फलंदाजीमुळे तिला जगातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानले जाते. या विक्रमामुळे, तिचे नाव आता जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
विश्वचषकात मात्र कामगिरी निराशाजनक
हा विश्वविक्रम नोंदवल्यानंतरही, स्मृती मानधना सध्याच्या विश्वचषकात अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरली आहे, हे एक निराशाजनक सत्य आहे. यापूर्वी ती सलग तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरली आहे. बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडल्यानंतरही, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या तिसऱ्या सामन्यात ती फक्त २३ धावा करून बाद झाली. विक्रमी कामगिरीनंतरही मानधनाची ही खराब कामगिरी भारतीय संघासाठी चिंतेचा विषय असली तरी, तिने २८ वर्षांचा मोठा विक्रम मोडीत काढून जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे नाव उंचावले आहे, यात शंका नाही.












Click it and Unblock the Notifications