IND vs NZ 2nd ODI: राजकोटमध्ये रंगणार भारत-न्यूझीलंड थरार! पाहा खेळपट्टी आणि हवामान अहवाल
IND vs NZ 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील रोमांच आता राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर पोहोचला आहे. वडोदरा येथील पहिल्या सामन्यात दिमाखदार विजय मिळवून टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आज (बुधवार, १४ जानेवारी) होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने रोहित शर्माची पलटण मैदानात उतरेल.

फलंदाजांसाठी नंदनवन ठरणार राजकोटची खेळपट्टी
राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी अनुकूल राहिली आहे. या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येतो, त्यामुळे प्रेक्षकांना आज चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळू शकते. खेळपट्टीवर चांगला बाऊन्स असल्याने फलंदाज आपल्या शॉट्सवर पूर्ण विश्वास ठेवू शकतात. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला काही प्रमाणात मदत मिळू शकते, परंतु जराशी चूक झाल्यास राजकोटची छोटी बाउंड्री गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरेल. त्यामुळे आजचा सामना हाय-स्कोअरिंग होण्याची दाट शक्यता आहे.
हवामानाचा अंदाज: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
राजकोटमधील हवामान आज क्रिकेटसाठी अत्यंत पोषक असणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पावसाची कोणतीही शक्यता नाही, त्यामुळे चाहत्यांना संपूर्ण १०० षटकांचा खेळ पाहायला मिळेल. दिवसाचे कमाल तापमान २८°C तर किमान १४°C राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या उन्हात खेळ सुरू होईल, तर संध्याकाळी गुलाबी थंडीचा आनंद खेळाडूंना घेता येईल.
टॉस ठरणार 'गेम चेंजर'
राजकोटमध्ये दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता कमी असली तरी, संध्याकाळच्या वेळी चेंडू ग्रिप करणे फिरकीपटूंना कठीण जाऊ शकते. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो, जेणेकरून लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे होईल. वडोदरा येथे विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे, मात्र न्यूझीलंडला कमी लेखून चालणार नाही.












Click it and Unblock the Notifications