Ind Vs Eng test match : भारत व इंग्लंडच्या खेळाडूंनी दंडाला काळी पट्टी का बांधली?, नेमकं कारण काय!
Indian and England Players Wear Black Bands : आज शुक्रवार, 20 जून रोजी सुरू झालेल्या लीड्स कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत. त्यांनी अचानक काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर उतरण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. परंतु, त्याचे कारण आता समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना दोन्ही देशाच्या सर्व खेळाडूंनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. हाताच्या दंडाला काळी पट्टी बांधून तसेच एक मिनिटांचे मौन देखील त्यांनी पाळले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतला निर्णय?
तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीचा पहिला सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारी सामन्याचा पहिला दिवस आहे आणि पहिले सत्र सुरू आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात विनाविलंब 15 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल सलामीला येत आहेत. जयस्वालने चौकार मारून संघाचे खाते उघडले आहे.
ALL PLAYERS WEARING BLACK ARM BANDS FOR AHMEDABAD PLAIN CRASH INCIDENT 🇮🇳🏴🫡 pic.twitter.com/Gwb5Dc1CT0
— DIVYANSH CHAUHAN (@Imchauhan28) June 20, 2025
साई सुदर्शन पदार्पण करत आहे. त्याला चेतेश्वर पुजाराने पदार्पणाची कॅप दिली. सुदर्शन भारताचा 317 वा कसोटी खेळाडू बनला आहे.
20 जून रोजी कसोटी पदार्पण करणारा तो चौथा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांनी या तारखेला पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे तिघांनीही 100 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळले आहेत.
या सामन्यासह, भारत आणि इंग्लंड संघ 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) चक्रात आपापल्या मोहिमांना सुरुवात करत आहेत. भारत WTC च्या पहिल्या दोन अंतिम सामन्यात उपविजेता होता. 2021 मध्ये न्यूझीलंडने त्यांना आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभूत केले.
त्याच वेळी, इंग्लंडने आतापर्यंत एकही अंतिम सामना खेळलेला नाही. टीम इंडिया 25 वर्षीय युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेला आहे. त्याच वेळी, 34 वर्षीय अनुभवी अष्टपैलू बेन स्टोक्स इंग्लंडचे नेतृत्व करत आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर.
भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.
अहमदाबाद विमान अपघात; 279 जणांचा मृत्यू!
अहमदाबादहून लंडनला जाणारं बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान 12 जून रोजी टेकऑफनंतर काही क्षणातच बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला जाऊन धडकलं होतं. या भीषण दुर्घटनेत या दुर्घटनेत 241 प्रवाशांसह जमिनीवर असलेल्या 38 जणांचा मृत्यू झाला, एकूण मृतांचा आकडा 279 वर पोहोचला आहे. दरम्यान, आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला टेस्ट मॅचचा प्रारंभ झाला. सामन्याच्या सुरुवातीलाच दोन्ही देशाचे खेळाडू मैदानावर उतरले तेव्हा त्यांच्या हाताच्या दंडाला काळी पट्टी बांधलेली दिसली. त्यांनी अहमदाबाद दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ ही काळी पट्टी बांधली आहे.












Click it and Unblock the Notifications