गोल्डन स्पाइक: 'गोल्डन बॉय' ठरला ग्लोबल हिरो, नीरज चोप्राने पुन्हा रचला इतिहास
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा देशाचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे. चेक प्रजासत्ताकातील ओस्ट्रावा शहरात झालेल्या गोल्डन स्पाइक 2025 स्पर्धेत नीरजने जबरदस्त कामगिरी करत सुवर्ण पदकावर कब्जा केला. ही कामगिरी विशेष ठरते कारण काही दिवसांपूर्वीच नीरजने पॅरिस डायमंड लीगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता आणि आता ही त्याची सालाखालून दुसरी मोठी विजयी कामगिरी ठरली आहे.

नीरज चोप्राने पटकावले सुवर्णपदक
नीरजसाठी ही स्पर्धा सुरुवातीला सोपी नव्हती. पहिला थ्रो त्याचा फाउल (चुकीचा) ठरला, परंतु त्याने लगेचच जबरदस्त पुनरागमन केले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 83.45 मीटर, तर तिसऱ्या थ्रोमध्ये 85.29 मीटर इतकी मोठी फेक केली, जी संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम थ्रो ठरली आणि त्याने पहिल्या क्रमांकावर कब्जा केला.
यानंतरच्या थ्रोमध्ये त्याचे प्रयत्न अनुक्रमे 82.17 मीटर, 81.01 मीटर आणि शेवटी पुन्हा एक फाउल थ्रो असे होते. मात्र त्याचा तिसरा थ्रोच पुरेसा ठरला विजयासाठी.
काय आहे गोल्डन स्पाइक?
गोल्डन स्पाइक ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रतिष्ठित अॅथलेटिक्स स्पर्धा आहे, जी World Athletics Continental Tour Gold या साखळीचा भाग आहे. डायमंड लीगनंतर ही एक अतिशय मानाची स्पर्धा मानली जाते. विशेष म्हणजे या स्पर्धेचे डायरेक्टर नीरज चोप्राचे कोच आणि भालाफेकीतील दिग्गज खेळाडू जान झेलेझनी आहेत.
नीरजच्या या विजयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
नीरजला मिळत आहे 'गोल्डन बॉय'चा सन्मान
या विजयामुळे नीरज चोप्राला "गोल्डन बॉय", "भारताचा अभिमान" अशा विशेषणांनी गौरवले जात आहे. त्याने पुन्हा सिद्ध केले आहे की तो केवळ ऑलिंपिक विजेता नाही, तर सातत्यपूर्ण कामगिरी करणारा एक विश्वासार्ह खेळाडू देखील आहे.
स्पर्धेनंतर नीरज म्हणाला, "माझ्याकडून याहूनही चांगली कामगिरी होऊ शकते, याची मला जाणीव आहे. माझे पुढील लक्ष्य म्हणजे 90 मीटरची सीमा पार करणं."
नीरजच्या सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी कामगिरीवरून हे निश्चित वाटते की तो पुढील ऑलिंपिकसाठी पूर्णपणे सज्ज आहे.
नीरज चोप्राचा हा विजय केवळ पदकाचाच नाही, तर तो एक प्रेरणादायी क्षण आहे भारतीय क्रीडाजगतातील नव्या पिढीसाठी. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने भारताची शान वाढवणारा हा 'गोल्डन बॉय' लवकरच इतिहास घडवणार, यात शंका नाही.












Click it and Unblock the Notifications