मुंबई इंडियन्सने सोडलं अन् त्याने इतिहास घडवला! केरळच्या विघ्नेशचा 'सुपरमॅन' अवतार; रचला रेकॉर्ड!
Vignesh Puthur world record : आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी क्रिकेट विश्वातून एक अत्यंत थक्क करणारी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सने रिलीज केलेल्या आणि आता राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात सामील झालेल्या केरळच्या एका युवा खेळाडूने असा पराक्रम केला आहे, जो क्रिकेटच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात आजवर कोणालाही जमलेला नाही. केरळचा अष्टपैलू खेळाडू विघ्नेश पुथूर याने आपल्या क्षेत्ररक्षणाने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

मैदानावर 'सुपरमॅन'ची एन्ट्री: ६ झेल आणि विश्वविक्रम!
विजय हजारे ट्रॉफी २०२५ अंतर्गत अहमदाबादमधील गुजरात कॉलेज ग्राउंडवर केरळ आणि त्रिपुरा यांच्यात सामना रंगला होता. आपल्या लिस्ट-ए पदार्पणाच्या सामन्यातच विघ्नेश पुथूरने क्षेत्ररक्षणाची नवी व्याख्या लिहिली. या सामन्यात त्याने एक-दोन नव्हे, तर तब्बल ६ झेल टिपले.
विशेष म्हणजे, लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात 6 झेल घेणारा तो जगातील पहिला आउटफिल्ड खेळाडू ठरला आहे. त्याने त्रिपुराच्या उदयन बोस, श्रीदाम पॉल, स्वप्नील सिंग, सौरभ दास, अभिजित सरकार आणि विकी साहा यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्यात मोलाची भूमिका बजावली.
जॉन्टी रोड्स अन् हॅरी ब्रूकसारखे दिग्गज मागे!
विघ्नेशच्या या कामगिरीने क्रिकेटमधील अनेक महान क्षेत्ररक्षकांचे विक्रम मोडीत काढले आहेत. याआधी एका सामन्यात सर्वाधिक ५ झेल घेण्याचा विक्रम संयुक्तपणे अनेक खेळाडूंच्या नावावर होता. विघ्नेशने ज्या दिग्गजांना मागे टाकले, त्यात खालील नावांचा समावेश आहे:
- जॉन्टी रोड्स (दक्षिण आफ्रिका, १९९३)
- हॅरी ब्रूक (इंग्लंड, २०२५)
- पीटर हँड्सकॉम्ब (व्हिक्टोरिया, २०२३)
- ब्रॅड यंग आणि एरियन संगमा
आता या सर्वांना मागे सारत विघ्नेश पुथूरचे नाव या ऐतिहासिक यादीत अव्वल स्थानी कोरले गेले आहे.
राजस्थान रॉयल्ससाठी ठरणार 'लकी चार्म'?
विघ्नेश पुथूरसाठी हा काळ अतिशय भाग्याचा ठरत आहे. आयपीएल २०२५ पर्यंत तो मुंबई इंडियन्सच्या गोटात होता, मात्र अलीकडेच झालेल्या लिलावात मुंबईने त्याला रिलीज केल्यानंतर राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. लिलाव संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्याने हा जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याने राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापन नक्कीच आनंदी असेल. आयपीएल २०२६ मध्ये राजस्थानसाठी तो 'गेमचेंजर' ठरू शकतो.
सामन्याचा थोडक्यात आढावा: केरळचा दिमाखदार विजय!
या सामन्यात केरळने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात त्रिपुरावर वर्चस्व गाजवले.
फलंदाजी: केरळने ५० षटकांत ८ बाद ३४८ धावांचा डोंगर उभा केला. विष्णू विनोदने अवघ्या ६२ चेंडूत १०२ धावांची वादळी खेळी केली, तर रोहन कुन्नम्मलने ९४ धावांचे योगदान दिले.
गोलंदाजी : बाबा अपराजितने ५ गडी बाद करत त्रिपुराचे कंबरडे मोडले.
निकाल : त्रिपुराचा संघ २०३ धावांत गारद झाला आणि केरळने १४५ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.












Click it and Unblock the Notifications