SA vs AFG : हलके मे नै लेने का... कसे राहिलेत SA vs AFG यांच्यातील यापूर्वीचे सामने, वाचा सविस्तर
चॅम्पियन्स ट्रॉफी- २०२५ मध्ये आजचा तिसरा सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे. कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. या स्पर्धेतला दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असेल. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता तो सुरु होईल. गेल्या काही वर्षांतील अफगाणिस्तान संघाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी पाहिली तर त्यांनी अनेक धक्कादायक निकाल नोंदवले आहेत. त्यांचा संघ या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवण्यात त्यामुळेच यशस्वी झाला. आफ्रिकन संघाबद्दल बोलायचे झाले तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांचा अलिकडचा रेकॉर्ड तितकासा चांगला राहिलेला नाही.

कसा असेल सामना?
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाल्यास अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघात आत्तापर्यंत पाच एकदिवशीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी आफ्रिकन संघाने तीन, तर अफगाणिस्तानने दोन सामने जिंकले आहेत. गेल्या तीन सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, अफगाणिस्तानने त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघांमधील शेवटची एकदिवसीय मालिका २०२४ मध्ये शारजाह येथे खेळली गेली होती. अफगाणिस्तानने ती मालिका २-१ ने जिंकली होती. अशा परिस्थितीत, अलिकडच्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड तितकासा चांगला राहिलेला नाही. त्यामुळे आफ्रिकन संघ अफगाणिस्तानला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही, असे दिसतेय.
अफगाणिस्तान चमकलाय
गेल्या काही सामन्यांतील कामगिरी पाहिली तर, अफगाणिस्तान संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्यांनी गेल्या चार द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वेचा २-० असा पराभव केला होता. त्याआधी त्यांनी बांगलादेश (२-१), दक्षिण आफ्रिका (२-१) आणि आयर्लंड (२-०) यांचा पराभव केला होता.
दक्षिण आफ्रिकेचे रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचे झाले तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांचा अलिकडचा रेकॉर्ड आणखी वाईट आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, आफ्रिकन संघाने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध तिरंगी मालिका खेळली. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला प्रथम न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर त्यांना पाकिस्तानकडूनही पराभव पत्करावा लागला. त्याआधी, आफ्रिकन संघाने घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली होती, जिथे त्यांना ३-० असा क्लीन स्वीप करावा लागला होता.












Click it and Unblock the Notifications