BCCI घेणार विशेष निर्णय; रोहित शर्मा, विराट कोहलीचे होणार 2 कोटींचे नुकसान, वाचा नेमकं काय झालंय...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI लवकरच भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंसाठी केंद्रीय करार जाहीर करणार आहे. या करारावेळी बोर्ड काही महत्त्वाचे बदल करू शकते. याबदलांमुळे कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूंचे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे सांगितले जात आहे. सध्या या तिन्ही खेळाडूंचा समावेश ए प्लस ग्रेडमध्ये आहे, परंतु आता त्यांचा ग्रेड ए पर्यंत कमी केला जाऊ शकतो, असे काही मिडिया हाऊसचे म्हणणे आहे.

कशामुळे कमी होतील रोहित, विराटचे ग्रेड?
रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर टी-२० फॉरमॅटला निवृत्ती जाहीर केली. जे खेळाडू क्रिकेटच्या तीन्ही फार्ममध्ये खेळतात त्यांच्यासाठी बीसीसीआय ए+ ग्रेड ठरवून देते. जे तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतात त्यांच्यासाठीच हा ग्रेट असतो. दुसरीकडे रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा हे कसोटी आणि एकदिवसीय फाँर्मेटमध्ये खेळत असले तरी टी-२० खेळत नाहीत. त्यामुळे बोर्ड त्यांचे ग्रेड बदलू शकते, असा अंदाज आहे.
होणार आर्थिक नुकसान
बीसीसीआय खेळाडूंना त्यांच्या श्रेणीनुसार पगार देते. A+ ग्रेडच्या खेळाडूंना दरवर्षी ७ कोटी रुपये मिळतात. तर A ग्रेडच्या खेळाडूंना दरवर्षी ५ कोटी रुपये मिळतात. जर रोहित, कोहली आणि जडेजाचे ग्रेड घसरले तर त्यांना २ कोटी रुपयांपर्यंत नुकसान होऊ शकते. परंतु बीसीसीआय या ज्येष्ठ खेळाडूंसाठी नेमका काय निर्णय घेतात ते येत्या काही दिवसांत समोर येणार आहे. मात्र सध्यातरी या तिन्ही खेळाडूंना दोन कोटींचे आर्थिक नुकसान होईल, अशी शक्यता आहे.
कोण आहेत ए प्लस ग्रेडमध्ये?
बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत ए+ ग्रेडमध्ये फक्त चार खेळाडू आहेत. त्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. बीसीसीआयच्या ए ग्रेडमध्ये सहा खेळाडूंचा समावेश आहे. त्यात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या आणि रविचंद्रन अश्विन यांचा समावेश आहे. तर ग्रेड बी मध्ये ऋषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव यांची नावे आहेत.


Click it and Unblock the Notifications