Australia vs India 2nd Test : भारत-आस्ट्रेलियाची गुलाबी चेंडूसोबत 'गाठ!', कुणाचे पारडे जड? वाचा
Australia vs India 2nd Test : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मधील दुसरी कसोटीला आज सकाळी साडे नऊ वाजता प्रारंभ होणार आहे. ॲडलेडच्या मैदानावर गुलाबी चेंडूने ही कसोटी खेळवली जाणार आहे. गेल्या काही वर्षांत दोन्ही संघांनी गुलाबी चेंडूच्या कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत या सामन्यातही चुरशीची अपेक्षा आहे.
घरच्या मैदानावर आस्ट्रेलिया वरचढ
ऑस्ट्रेलियाने गेल्या काही वर्षांत पिंक बॉल कसोटीत आपला दबदबा निर्माण केला आहे. घरच्या मैदानावर गुलाबी चेंडूने खेळलेल्या बहुतेक कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी विजय संपादन केला आहे. पॅट कमिन्स, स्टार्क आणि नॅथन लियॉनसारखे अनुभवी गोलंदाज गुलाबी चेंडूच्या खेळात महत्त्वाची भूमिका बजावतात.

गुलाबी चेंडूच्या कसोटीत भारताची चमकदार कामगिरी
भारताने गुलाबी चेंडूच्या कसोटी क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी केली आहे आणि फक्त एक गुलाबी चेंडूने खेळलेला एक कसोटी सामना गमावला आहे. गुलाबी चेंडूने खेळताना भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धही चांगली कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनसारखे गोलंदाज हे गुलाबी चेंडूच्या खेळात भारताचे बलस्थान मानले जातात.
दिग्गज फलंदाजांना गुलाबी चेंडूचा अनुभव
भारतीय फलंदाजांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे अनुभवी खेळाडू गुलाबी चेंडूविरुद्ध चांगली कामगिरी करू शकतात. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता. ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. भारताविरुद्धच्या गुलाबी चेंडूच्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात एक बदल केला आहे.
भारत - आस्ट्रेलियात कसोटीतील विजय पराजय
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यांमध्ये 108 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने 45 वेळा जिंकले आहे तर भारताने 33 वेळा पराभव केला आहे. 29 सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन: उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कप्तान), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.












Click it and Unblock the Notifications