रोहित शर्मा अन् विराट कोहलीनंतर आणखी एका दिग्गज खेळाडूने घेतली कसोटीतून निवृत्ती, चाहत्यांना धक्का!
former Sri Lanka captain Angelo Mathews Retirement : भारतीय क्रिकेट संघ आगामी 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलेला आहे. कारण, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन चाहत्यांना तर धक्काच दिला.
त्यांच्या निवृत्तीवर अजूनही चर्चा सुरू असतानाच क्रिकेट विश्वातून आणखी एक चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. कारण, क्रिकेट जगतातील आणखी एका दिग्गजाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण हा खेळाडू भारतीय संघाचा नव्हे तर श्रीलंकेच्या टीमचा भाग आहे, परंतु, त्याने देखील कसोटी क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिलेले आहे. त्याचे नाव आहे अँजेलो मॅथ्यूज.

अँजेलो मॅथ्यूज कसोटी खेळातून निवृत्त
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात गॉल येथे बांगलादेशविरुद्ध होणारी दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी मॅथ्यूजची श्रीलंकेसाठी शेवटची कसोटी असणार आहे.
काही माध्यमांच्या अहवालानुसार, मॅथ्यूज म्हणाला की, पुढच्या पिढीने जबाबदारी घेण्याची ही योग्य वेळ आहे. यासह त्याने राष्ट्रीय संघासाठी पांढऱ्या चेंडूने म्हणजेच एकदिवसीय क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचे पुष्टी देखील केली आहे.
मॅथ्यूजने केली एक भावनिक पोस्ट
निवृत्तीच्या घोषणेनंतर मॅथ्यूजने इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट केली. तो म्हणाला की, "तुटलेले हृदय आणि अनेक गोड आठवणींसह, माझ्यासाठी माझ्या सर्वात आवडत्या खेळाच्या स्वरूपाला, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटला निरोप देण्याची वेळ आली आहे, श्रीलंकेसाठी गेल्या 17 वर्षांचा क्रिकेट खेळ माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आणि अभिमान होता. देशाची जर्सी घालताना वाटणाऱ्या देशभक्ती आणि सेवेच्या भावनेला काहीही हरवू शकत नाही. मी माझे सर्वस्व क्रिकेटला दिले आहे आणि त्या बदल्यात क्रिकेटने मला सर्वस्व दिले आहे आणि आज मी जो व्यक्ती आहे तो बनवला आहे.
बांगलादेशविरुद्ध शेवटचा सामना खेळणार
श्रीलंकेसाठी 118 कसोटी सामने खेळणाऱ्या मॅथ्यूजने 44.62 च्या सरासरीने 8,167 धावा केल्या आहेत, ज्यात 16 शतके आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. 17 जूनपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात, मॅथ्यूजला 'घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या' यादीत विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी आहे, जो त्याच्यापेक्षा फक्त 13 धावांनी मागे आहे.
तरुण खेळाडूंना सांगितली मनातली गोष्ट
मॅथ्यूजने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याला पाठिंबा दिल्याबद्दल आणि त्याच्या आणि संघाच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. यासोबतच तो म्हणाला की, माझा असा विश्वास आहे की, हा कसोटी संघ एक प्रतिभावान संघ आहे ज्यामध्ये भविष्यातील आणि वर्तमानातील अनेक महान खेळाडू खेळत आहेत. आपल्या देशासाठी चमक दाखवणाऱ्या तरुण खेळाडूला पुढे आणण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे, असे मला दिसते.












Click it and Unblock the Notifications