AFG vs NZ: अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी सामना पाचव्या दिवशी रद्द, हे 91 वर्षात पहिल्यांदाच घडलं
AFG vs NZ: अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स ग्राउंड कॉम्प्लेक्समधील एकमेव कसोटी सामना एकही चेंडू न टाकता रद्द घोषित करण्यात आला आहे. क्रिकेटच्या इतिहासातील हा केवळ 8 वा कसोटी सामना होता. जो एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द करण्यात आला. ग्रेटर नोएडाच्या मैदानावरील अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झालेला 21 व्या शतकातील आशियातील पहिला कसोटी सामना ठरला आहे.
दरम्यान दिल्ली एनसीआर भागात पहिल्या दिवशी मुसळधार पावसामुळे कोणताही संघ मैदानात उतरू शकला नाही. दुसऱ्या दिवशी, मैदानावरील कर्मचाऱ्यांनी मुख्य मैदानावरील सराव खेळपट्ट्यांमधून गवत वापरून आऊटफील्ड सुधारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मैदानावर ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे पंचांनी मैदान खेळण्यासाठी अयोग्य असल्याचे घोषित केले.

या सामन्यामुळे 21 व्या शतकात प्रथमच आशिया खंडातील कसोटी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यापूर्वी 1890, 1938 आणि 1970 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेदरम्यानचे सामने पूर्णपणे रद्द करण्याच्या घटना घडल्या होत्या. तर 1989 ते 1998 दरम्यान आणखी चार वेळा असे घडले होते. भारतात 1933 पासून कसोटी सामने खेळले जात आहेत आणि कोणताही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) जाहीर केले की, 'ग्रेटर नोएडामध्ये अजूनही पाऊस पडत आहे आणि सततच्या पावसामुळे, अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या 5 व्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळही सामना अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे.'
दोन्ही संघांच्या पुढील योजना
न्यूझीलंडचा कसोटी संघ 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेसाठी श्रीलंकेला जाणार आहे. त्यानंतर ते ऑक्टोबरमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात परततील. दरम्यान अफगाणिस्तान पुढील आठवड्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचे यजमानपदासाठी यूएईला जाणार आहे.
डेहराडून आणि कानपूरच्या ऑफर असूनही ACB ने दिल्लीच्या जवळ असल्यामुळे ग्रेटर नोएडा हे ठिकाण निवडले. काबूल आणि दिल्ली यांच्यातील चांगल्या कनेक्टिव्हिटीवर या निर्णयाचा प्रभाव पडला. न्यूझीलंड क्रिकेटच्या अधिकृत घोषणेत म्हटले आहे की, 'नोएडामधील मुसळधार पावसामुळे अफगाणिस्तानविरुद्धचा एकमेव कसोटी सामना पाचव्या दिवशी अधिकृतपणे रद्द करण्यात आला आहे.'












Click it and Unblock the Notifications