Mumbai New CP: मायानगरी मुंबईचे पुढील पोलिस आयुक्त कोण? 5 अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा, वर्णी कुणाची?
Who will be the new Police Commissioner of Mumbai city : मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे त्यांच्या पदावरुन वयोमानुसार, 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांचा जागी कोणत्या अधिकाऱ्याची पोलिस आयुक्त म्हणून वर्णी लागणार यावर चर्चा रंगली आहे. पाच बड्या अधिकाऱ्यांच्या नावाची देखील चर्चा आता सुरू झाली आहे. यात एका महिला पोलिस अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे मुंबई महिला पोलिल आयुक्त भेटणार का, अशी चर्चा देखील होऊ लागली आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या नावाची रंगलीय चर्चा?
महिला आयपीएस अधिकारी अर्चना त्यागी, रितेश कुमार आणि देवेन भारती या तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा मुंबई पोलिस आयुक्तपदासाठी रंगलेली आहे. त्यात विशेष करून अर्चना त्यागी यांचे नाव अधिक चर्चेत आहे. त्यांची जर या पदावर नियुक्ती झाली तर मुंबई पोलिस आयुक्तांच्या खूर्चीवर प्रथमच एक महिला आय़पीएस बसणार आहे. दरम्यान, कोणाच्याच नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. ही घोषणा कधीही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पोलिस सेवेतील ज्येष्ठतेनुसार 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा हे आयुक्तपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. एप्रिल 2028 मध्ये निवृत्त होणार असलेल्या वर्मा यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये काही काळासाठी पोलिस महासंचालक म्हणून काम केले होते. त्यांच्याच बॅचचे असलेले आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांचेही नाव चर्चेत आहे.
महिलेस आयुक्तपदी संधी?
आयपीएस अर्चना त्यागी यांचे नाव मुंबई पोलिस आयुक्त पदासाठी अधिक चर्चेत आहे. पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही माध्यमांशी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्चना त्यागी यांच्या नावाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत. जर ही निवड झाली, तर मुंबई पोलिस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला संधी मिळणार आहे.
कोण आहेत अर्चना त्यागी?
अर्चना त्यागी या 1993 बॅचच्या अधिकारी आहेत. ज्या सध्या महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत आहेत. त्या त्यांच्या कार्यक्षमतेसाठी 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या सेवाकारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. कायदा सुव्यवस्था न राखणाऱ्यांच्या त्या कर्दनकाळ आहेत, अशी ही त्यांची ओळख सांगितली जात आहे.
सदानंद दातेंचे नाव का मागे पडले?
सुरुवातीला नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (NIA) महासंचालक सदानंद दाते यांचे नाव देखील चर्चेत होते. मात्र, ते सध्या पाकिस्तानातील तहावूर राणा प्रकरण आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने केंद्र सरकार त्यांना सोडण्यास इच्छुक नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे अर्चना त्यागी यांचं नाव अधिक बळकट झालं आहे.












Click it and Unblock the Notifications