राज्यातील या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, तुमच्या जिल्ह्यातील अंदाज काय?
अखेर १३ मे रोजी मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे. तर दुसरीकडे देशात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे. पुढील काही दिवस सुद्धा काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह देशाच्या किनारपट्टी भागांमध्ये एक नवी प्रणाली सक्रिय होत आहे. या प्रणालीचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील उत्तर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली होती. पुढील २४ तासात सुद्धा या भागात पाऊस होऊ शकतो.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विदर्भ क्षेत्रामध्ये बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्रालाही वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
चक्रीवादळाचा होणार परिणाम
बंगालच्या उपसागरात 23 ते 28 मे दरम्यान चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. अशी शक्यता केंद्रीय हवामान विभागाने वर्तवली आहे. प्राथमिक स्वरुपात शक्ती असे या चक्रीवादळाचे असल्याचे माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर 16 ते 18 मे या दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्रतेने सक्रिय होणार आहे. परिणामी कर्नाटक, कोलकाता इथे पावसाचा तडाखा बसू शकतो.
देशात पुढील 24 तासांमध्ये गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गोवा, छत्तीसगढ, सिक्कीम, कर्नाटक, तामिळनाडू केरळ, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेश या भागांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, गोवा आणि कोकणात पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे (घाट विभागासह), नाशिक (घाट विभागासह), कोल्हापूर (घाट विभागासह), सातारा (घाट विभागासह), सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, वाशीम, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुण्यातील अंदाज काय?
पुणे शहरात मागील ४ ते ५ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पाऊसही झाला आहे. मंगळवारी शहरात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, पुढील चार दिवस पुणे शहरात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहराला पुढील चार दिवस 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications