सावधान! मुंबईत लोकलने फुकट प्रवास करताय..? 'त्या' फुकट्यांकडून वसूल केला १.७२ कोटींचा दंड
पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगर नेटवर्कने फुकट प्रवास करणाऱ्यांवर आता करडी नजर ठेवली आहे. मुंबईतील लोकल एसी गाड्यांवरही बारकाईने लक्ष दिले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर व फुकट प्रवास करणाऱ्यांवर आता रेल्वे प्रशासनाने दंडाची कारवाई तीव्र केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या वर्षभरात तपासी पथकाने फुकट्यांकडून सुमारे १.७२ कोटी रुपयांची वसूली केल्याचे सांगितले जात आहे.

किती प्रवासी प्रवास करतात?
मुंबई एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कने तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडात त्यामुळे लक्षणीय वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी नुकत्याच दिलेल्या एका निवेदनानुसार, मुंबई उपनगरीय विभागात दररोज १०९ एसी लोकल गाड्या चालवल्या जातात. त्यातून सुमारे १.२६ लाख प्रवासी प्रवास करतात.
पावणे दोन कोटींचा दंड वसूल
चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये (जानेवारी पर्यंत) मुंबई विभागातील तिकीट तपासणी पथकांनी अनियमित प्रवासाची ५१,६०० हून अधिक प्रकरणे शोधून काढली. त्यातून १.७२ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईमुळे फुकट प्रवास करणाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. जानेवारी २०२५ मध्येच पश्चिम रेल्वेने अनधिकृत प्रवासाच्या ६,२५८ प्रकरणांमध्ये २०.९७ लाख रुपये दंड वसूल केला जानेवारी २०२४ च्या तुलनेत यावर्षीच्या दंडात ३१ टक्के वाढ झाली. तसेच पकडलेल्या प्रकरणांमध्ये ३२ टक्के वाढ झाली. या प्रकरणातील ४,७४३ फुकट्यांकडून १६.०७ लाख रुपये वसूल करण्यात आले.
कडक होणार तिकीट तपासणी
नियमानुसार प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेगवेगळी पावले उचलली आहे. पश्चिम रेल्वेने अनेक प्रमुख उपक्रम राबवले आहेत. उपनगरीय गाड्यांमधील अनियमित प्रवासावर लक्ष ठेवण्यासाठी एसी टास्क फोर्स, तिकीट तपासणी ऑपरेशन्सवर देखरेख करण्यासाठी एक विशेष देखरेख पथक आणि अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी वारंवार विशेष मोहिमा यांचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, प्रवासी एसी लोकल ट्रेनबाबत २४x७ तक्रारी हेल्पलाइन क्रमांक १३९ किंवा ९००४४९७३६४ वर व्हॉट्सअॅपद्वारे नोंदवू शकतात, ज्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांकडून त्वरित कारवाई केली जाईल.












Click it and Unblock the Notifications