विशाल गवळी व पत्नीला सात दिवसांची कोठडी; सलून दुकानातून अगदी सिनेस्टाईल केला होता जेरबंद
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. विशाल गवळी याने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा खून केला होता. मृतदेहाचे तुकडे करुन मृतदेह सुटकेसमध्ये भरुन आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या प्रकरणातील संशयीत आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी शेगावमधून सिनेस्टाईल अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले आहे. गवळी पती-पत्नीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

कशी केली अटक
अल्पवयीन मुलीचा खून हा विशाल गवळीनेच केल्याचे उघड झाले. विशालच्या पत्नीनेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचे कबूल केले. त्यानंतर आरोपी विशाल हा शेगावला गेल्याचे समजले. तेथे पोलिसांनी त्याचा माग शोधला. विशाल एका सलून दुकानात दाढी-कटींग करत असतानाच पोलिसांनी त्याला जेरबंद केले. या सलून दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झाले आहे. पोलिसांनी दाढी झाल्यावर अगदी सिनेस्टाईल आरोपीला अटक केली.
काय आहे व्हिडीओत
या व्हिडीओत आरोपी विशालच्या हालचाली स्पष्ट दिसत आहे. दाढी झाल्यानंतर दुकानात बाजूलाच बसलेला पोलिस कर्मचारी तोंडाला रुमाल बांधून येतो. त्याच्या अंगात निळी जिन्स व टीशर्ट आहे. विशालच्या अंगातही जीन्स व टी-शर्ट आहे. साध्या वेशातील पोलिस विशालशी बोलत असतानाच खुर्चीही फिरवतो. खुर्ची फिरवल्यावर विशालचा हात धरुन उठण्यास सांगतो. मात्र विशाल खुर्चीवर बसलेला आहे. त्यानंतर बाहेर वर्दीत असलेला पोलिस कर्मचारी आतमध्ये येतो. मग हे दोन्ही पोलिस विशालचे दोन्ही हात धरून त्याला दुकानाच्या बाहेर आणतात.
विशालचा मख्ख चेहरा
पोलिसांनी अटक केल्यावरही विशालच्या चेहऱ्यावरील हावभाव अजितबात बदलले नाहीत. त्याचा चेहरा अगदी मख्ख राहिलेला दिसला. उलट पोलिसांनी त्याला खुर्चीवर उठण्यासाठी सांगितल्यावर तो पोलिसांनाच प्रतिप्रश्न करताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावरील एकही रेघ साधी हाललीही नव्हती. अखेर पोलिसांनी त्याच्या दोन्ही हातांना धरुन त्याला दुकानाच्या बाहेर आणले तरी त्याच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप किंवा भिती दिसली नव्हती.
विशालसह पत्नीला पोलीस कोठडी
विशाल गवळी आणि त्याची बायको साक्षी हिला आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने दोघांनाही 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. आरोपीने अल्पवयीन मुलीचं अपहरण कुठून केलं? तिची हत्या कशी झाली? तिला कशा प्रकारे मारलं? त्याला या प्रकरणात मदत करणारे आणखी कोणी आहेत का? त्याने हत्या करण्यासाठी कोणतं साहित्य वापरलं? मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली? या सर्वांचा तपास करायचा असल्याने त्याची पोलीस कोठडी द्यावी, असी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यानुसार कोर्टाने ही कोठडी सुनावली.












Click it and Unblock the Notifications