विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; मुख्यमंत्री फडणवीस संतापले, म्हणाले..
गुरुवारी विधानभवनाच्या लॉबीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. गेल्या दोन दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक खटके उडत होते, ज्यामुळे आज विधानभवनात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, विधानसभेत मारामारी करणं योग्य नसल्याचं म्हणत त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील धुसफूस आज त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली. दोघांचेही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "घडलेली घटना अतिशय चुकीची आहे. अशा प्रकारची घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही. या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो. त्यामुळे सभापती आणि अध्यक्षांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी.
यासंदर्भात जी काही कडक कारवाई करावी अशी विनंती मी अध्यक्षांकडे केली आहे. या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणार नाही. म्हणून याच्यावर निश्चित कारवाई झालीच पाहिजे," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'मला मारण्यासाठी गुंड आले होते' - जितेंद्र आव्हाड
या हाणामारीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले. "पहिल्यांदा पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल तर आमचे लोक सुरक्षित नाहीत. माझ्यावर अश्लाघ्य टीका करण्यात आली. मी सभागृहात भाषण केल्यानंतर मोकळी हवा खाण्यासाठी बाहेर आलो असता माझ्यावर थेट हल्ला करण्यात आला. ते गुंड मलाच मारण्यासाठी आले होते," असा दावा आव्हाड यांनी केला.
प्रकरणानंतर गोपीचंद पडळकरांकडून दिलगिरी
या सर्व प्रकारानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. "विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. याचं अतीव दुःख मला आहे, सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर मी अधिक प्रतिक्रिया देईन," असे पडळकर म्हणाले. या घटनेपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.












Click it and Unblock the Notifications