वाशीमध्ये अग्नितांडव; 'रहेजा रेसिडन्सी'त भीषण आग, चिमुकलीसह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू!
Vashi Fire Tragedy 4 Dead : राज्यभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, नवी मुंबईसाठी मंगळवारची सकाळ (22 ऑक्टोबर 2024) दोन अत्यंत दुःखद बातम्या घेऊन उजाडली.
नवी मुंबईतील कामोठे आणि वाशी परिसरात लागलेल्या भीषण आगीच्या (Navi Mumbai Fire) दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. यापैकी, वाशी येथील रहेजा रेसिडन्सी या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये चार जणांचा करुण अंत झाला.

या अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे:
वेदिका सुंदर बालकृष्णन (वय 6)
कमला हिरल जैन (वय 84)
सुंदर बालकृष्णन (वय 44)
पूजा राजन (वय 39)
एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू
या दुर्घटनेत सुंदर बालकृष्णन, त्यांची पत्नी पूजा राजन आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी वेदिका यांचा होरपळून मृत्यू झाला. ऐन दिवाळीच्या उत्साहात या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे वाशी परिसरात शोककळा पसरली आहे आणि सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आजीबाईंना उठताच आले नाही, खोलीतील धुराने श्वास गुदमरला
या भीषण आगीमध्ये 84 वर्षांच्या कमला हिरल जैन यांनाही आपला जीव गमवावा लागला. कमला जैन या आजारी असल्याने बिछान्याला खिळून होत्या. आग लागल्यानंतर त्यांच्या घरातील इतर सदस्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली, मात्र अंथरुणावर खिळलेल्या कमला जैन यांना उठून बाहेर जाता आले नाही.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी तात्काळ बचावकार्याला सुरुवात केली आणि ते दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले. परंतु, या ठिकाणी प्रचंड धूर पसरल्यामुळे कमला जैन यांना तात्काळ बाहेर काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांचा आगीत होरपळून आणि विषारी धुराने श्वास गुदमरून जागेवरच मृत्यू झाला.
वाशीत नेमके काय घडले?
सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री सुमारे 12.40 वाजता वाशीतील रहेजा रेसिडन्सी या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर ही आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की तिने लगेचच 11व्या आणि 12 व्या मजल्यालाही कवेत घेतले. आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाचे तब्बल 40 जवान आग विझवण्यासाठी आणि बचावकार्यात सहभागी झाले होते. या भीषण दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर जवळपास 14 जण जखमी झाले. जखमींना तातडीने हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे.












Click it and Unblock the Notifications