वसंत मोरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, 9 जुलैला ठाकरे गटात प्रवेशाच्या चर्चा
मुंबई- पुणे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी करणारे वसंत मोरे यांच्या पक्षबदलाच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. गुरुवारी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. वसंत मोरे यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही दुजोरा दिला आहे.

वसंत मोरे यांचा मनसे, वंचित असा प्रवास करुन विधानसभेपूर्वी मशाल हाती घेण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.वसंत मोरे हे मनसेत असल्यापासून चर्चेत राहिलेले नेते आहेत. मनसेतही त्यांनी अनेकदा पक्षातील स्थानिक नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्याविरोधात त्यांनी रोखठोक विरोध केला होता. त्यानंतर वसंत मोरे यांची पुणे मनसे शहर अध्यक्षपदावरून तातडीने उचलबांगडी करण्यात आली होती. वसंत मोरे यांना पदावरून हटवल्यापासून ते मनसेला रामराम करतील अशी चर्चा होत्या.
मोरे यांना मनसेकडून पुणे मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र मनसेची भुमिका पाहिल्यावर तात्यांनी मनसेला रामराम ठोकला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून तिकीट मिळविण्यासाठी त्यांनी मोठमोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र त्यातही त्यांना यश आले नाही. ही जागा काँग्रेसला गेल्यावर आमदार रवींद्र धंगेकरांना तेथून तिकीट मिळाले. त्यानंतर तात्यांनी थेट प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश करुन लोकसभा लढविली. मात्र तेथे त्यांना मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले.
आज तात्यांनी थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भेटीनंतर संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी वसंत मोरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल संजय राऊत म्हणाले की, "भेट घेऊ द्या, काय हरकत आहे. ते कार्यकर्ते आहेत एका पक्षाचे. त्यांनी पुण्यात लोकसभा लढवली आहे. त्यांचं सामाजिक राजकीय कार्य चांगलं आहे. आज दुपारी ते उद्धव ठाकरे साहेबांना भेटले आहेत, हे खरं आहे आणि लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील, हे देखील तितकच खरं आहे."
नऊ जुलैचा मुहूर्त
वसंत मोरे हे नऊ जुलैला शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. या भेटीत नेमके काय झाले हे समजू शकले नाही. मात्र तात्यांनी आपली पुढील राजकीय भूमिका उद्धव ठाकरेंना सांगितल्याचे समजते. येत्या 9 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत मोरे शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications