उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीसांमध्ये गुप्त भेट, वंचित नेत्याच्या दाव्याने महाराष्ट्रात खळबळ
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व भाजपमधील राजकीय वैर सद्या सर्वश्रुत आहे. ठाकरेंकडून मोदी शहांवर ज्या पद्धतीने टीकास्त्र डागले जात आहे, त्यावरुन आता ठाकरे गट अन् भाजप एकत्र येणे अशक्य आहे. असे असताना उद्धव ठाकरे व भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मातोश्री येते गुप्त भेट झाल्याचा दावा करत वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य प्रवक्तांनी केला. या खळबळजनक दाव्यामुळे राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. तर जुने मित्र पुन्हा एकत्र येणार असल्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.

सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला शिवसेना ठाकरे व भाजपमधील राजकीय घटनाक्रमाविषयी एक विश्वासार्ह बातमी मिळाली आहे. त्यानुसार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 25 जुलै रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास 7 डी मोतीलाल मार्ग याठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर काही दिवसांतच 5 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री बंगल्यावर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. फडणवीस स्वतः गाडी चालवत एकटे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले. त्यांच्यात जवळपास 2 तास बैठक झाल्याचा दावा देखील मोकळे यांनी केला. त्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे फडणवीस ठाकरे भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे हे 6 ऑगस्ट् रोजी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले. दिल्लीला जाताना त्यांच्यासोबत कोण-कोण होते, दिल्लीत त्यांनी कुणाच्या भेटीगाठी घेतल्या हे उद्धव ठाकरे यांनीच जनतेला सांगितले पाहिजे, असे आव्हान देखील वंचित नेत्याने केले आहे.
आरक्षणवादी मतदारांची फसवणूक टळावी
वंचित बहुजन आघाडीला या घटनाक्रमाविषयी जी माहिती मिळाली आहे, ती आम्ही जनतेपुढे ठेवत आहोत. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील आरक्षणवादी मतदारांना भाजप व त्यांचे मित्रपक्ष हे आरक्षणविरोधी असल्याचे पक्के माहिती आहे. याच आरक्षणवादी मतदारांनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांना निवडून दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गत 5 वर्षांतील राजकीय घडामोडी पाहता यासंबंधी काही उलटसुलट राजकीय घडामोडी घडल्या तर महाराष्ट्रातील आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी आम्ही ही माहिती सार्वजनिक पटलावर ठेवत आहोत, असा दावा देखील सिद्धार्थ मोकळे यांनी केला.












Click it and Unblock the Notifications