बीडमध्ये सीआयडीची मोठी कारवाई; वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी, कराडचे बाँडीगार्डही बोलावले
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात आज बीड जिल्ह्यात मोठी घडामोड घडली. या प्रकरणातील फरार संशयित आरोपी वाल्मिक कराड याचा सीआयडी व पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान, आज सायंकाळी सीआयडीच्या पथकाने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांची सुमारे पाऊण तास कसून चौकशी केली. त्यानंतर मंजीरी यांना सोडून देण्यात आले.

सीआयडी अँक्शनमध्ये
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. सत्ताधारी व विरोधकांनीही हे प्रकरण चांगलेच उचलून धरले. अखेर मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालून सीआयडी चौकशी करावी लागली. सरपंच देशमुख यांच्या हत्येला १८ दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. त्यामुळे आज सीआयडी पथकाने जोर वाढवत फासे फिरवण्यास सुरुवात केली. आज दिवसभर सीआयडी पथकाने बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवाया केल्या.
मंजिरी कराडची चौकशी
फरार संशयीत आरोपी वाल्मिक कराड याचा शोध सुरु आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सीआयडी पथकाचे जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी वाल्मिक कराड यांची पत्नी मंजिरी कराड यांना चौकशीसाठी बोलावले. सुमारे ४० मिनिटे मंजिरी कराड यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीआयडी पथकाने त्यांना सोडून दिले. मात्र त्यानंतर कराड यांचे दोन अंगरक्षक व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या सर्वांची सध्या चौकशी सुरुच असल्याचे सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications