वाल्मिक कराडच्या पत्नीचा धस, क्षीरसागर, सोनवणेंना इशारा; म्हणाल्या, स्टेप बाय स्टेप त्यांचीही प्रकरण
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज बीड न्यायालयाने वाल्मिक कराडला सात दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली. त्यानंतर लगेच वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराड हिने पत्रकार परिषद घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. संतोष देशमुख जसे मराठा बांधव आहेत, तशीच मीही मराठा भगिनी आहे. त्यामुळे जरांगे यांनी मलाही न्याय द्यावा, माझ्याही पाठीशी उभं रहावं, अशी भावनिक साद त्यांनी घातली. शिवाय या पत्रकार परिषदेत त्यांनी आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर व खा. बजरंग सोनवणे यांना इशाराही दिला.

काय म्हणाल्या मंजिली कराड?
बीड प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू केल्याने आज आंदोलन केले नाही. परंतु वाल्मिक कराड यांना या प्रकरणात गुंतविण्यात आले आहे. नुसता फोन केला म्हणून हत्येचा गुन्हा नोंदवला जातो का? मिडिया ट्रायल करुन काही गोष्टी पेरल्या गेल्या आहेत. सोशल मीडियावर हे सगळं प्रकरण एकतर्फी चालवलं गेलंय. आता स्टेप बाय स्टेप अंजली दमानिया, सुरेश धस, संदीप क्षीरसागर व बजरंग सोनवणे यांच्या एकेक गोष्टी मी ही बाहेर काढणार आहे, असा इशारा मंजिली कराड यांनी दिला.
जरांगेंना भावनिक साद
मंजिली कराड यांनी जरांगे यांचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या, "डावपेच रचून माझ्या पतीला अडकवलं जातंय. मी माझा न्याय मागायचा कुणाकडे? मी आता मनोज जरांगे यांच्याकडेच न्याय मागते. मी सुद्धा मराठा समाजाचीच व्यक्ती आहे. आता जरांगे यांनी मलाही न्याय द्यावा. आज माय-बहिणीवर अन्याय होत असेल, कुटुंबावर अन्याय होत असेल तर तिला न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार आहे.", असं मंजिली कराड यांनी स्पष्ट केलं.
मुंडे भेटलेच नाहीत
पत्रकार परिषदेत कराड यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, मंजिली कराड या धनंजय मुंडे यांना भेटल्या किंवा धनंजय मुंडे मंजिली कराडला भेटले अशा अफवा पसरविल्या जात आहेत. धनंजय मुंडे मला भेटलेच नाहीत. हे सगळं परफेक्ट प्लॅनिंगनं केलं जातंय. मराठा-वंजारी हा वाद लावला जातोय. खा. बजरंग सोनवणे यांच्या मनात वेगळीच खदखद आहे. आज सकाळीच ते म्हणालेत की, बीड जिल्ह्याला दोन-दोन मंत्रीपदे कशी दिलीत. हा फक्त राजकीय वाद आहे, ज्यात माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा करण्यात आलंय, असंही कराड यांनी सांगितलं.












Click it and Unblock the Notifications