CID कोठडीत वाल्मिक कराडवर उपचार सुरु; नेमकं काय झालंय? प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची तब्बेत कोठडीतच बिघडली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र अचानक वाल्मिक कराडची तब्बेत बिघडल्याने त्याच्यावर कोठडीतच उपचार सुरु असल्याचे समजत आहे. दरम्यान आज वाल्मिक कराडचे व्हाईस सॅम्पल घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय झाले तब्बेतीला?
वाल्मिक कराड गेल्या नऊ दिवसांपासून बीडच्या सीआयडी कोठडीत आहे. वाल्मिक कराड आज आजारी पडला. वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग झाल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डाँक्टरांकडून देण्यात आली. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्याला डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप दिले आहेत.
आज घेणार व्हाईस सॅम्पल
सीआयडीच्या कोठडीत वाल्मिक कराडवर उपचार सुरु आहेत. आज CID कडून त्याचा व्हॉईस सॅम्पल घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. व्हाईस सॅम्पल जुळल्यानंतर वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होईल. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज एक महिना उलटला. हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड शरण आला. हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. घटनेचा तपास CID आणि SIT कडून सुरू आहे.
राज्यातील ग्रामपंचायती बंद
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आज राज्यातील सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली. हत्येचा निषेध करण्यासाठी आज राज्यातील ग्रामपंचायतीच्या वतीने कामकाज बंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायतींना आज कुलूप दिसत आहे. सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्यांनी बंदची हाक अनेक ठिकाणी दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications