सुरेश धसांना निवडणुकीसाठी वाल्मिक कराडने पुरवले पैसे; 'या' मोठ्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्रखर भूमिका घेतली आहे. त्यांनी वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केले आहे. धसांकडून रोज या प्रकरणात नवनवे आरोप होताना दिसत आहेत. मात्र आता याच धसांवर राष्ट्रवादीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी आ. सुरेश धस यांनी निवडणुकीला वाल्मिक कराडकडून पैसा आणले असा आरोप केला आहे. या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले आजबे?
राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब आजबे यांनी यापूर्वी आ. सुरेश धसांविरोधात आष्टी विधानसभा निवडणूक लढविलेली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आ. सुरेश धस यांचा भांडाफोड केला. त्यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप लावले. ते म्हणाले की, आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा दाखल आहे. आष्टी मतदारसंघात काय चालले आहे, ते बघा. आकाचे आणि धस यांचे लागेबांधे तपासा. आताच्या निवडणुकीत वाल्मिक कराड यांनी सुरेश धस यांचे काम केले. मी याबाबत अजित पवार यांना सांगितले आहे, असा मोठा दावा आजबे यांनी केला.
धसांवर केले गंभीर आरोप
यावेळी बोलताना आजबे म्हणाले की, धस यांनी आष्टीतील अनेक विकासकामे थांबवली आहेत. विकासकामांचे १५ कोटी वितरीत केले गेले नाहीत. हे सर्व आमदार सुरेश धस यांच्या सांगण्यावरून होत आहे. याबाबत मी जिल्हाधिकारी आणि सीइओ यांना निवेदन दिले आहे. गद्दाफी जसे हुकुमशहा वागत होते, तसे आमदार धस वागत आहेत. ठराविक ग्रामपंचायतची कामे अडवली जात आहेत. मी धस यांना सात वेळेस फोन केले. ज्या लोकावर अन्याय झाला ते लोक मी समोर आणणार आहे, असा इशाराही आजबे यांनी दिला.
देवस्थानच्या जमीनी हडपल्या
आजच्या पत्रकार परिषदेत आजबे यांनी आ. सुरेश धसांवर मोठे आरोप केले. ते म्हणाले की, आ. धस यांनी अनेकांच्या जमिनी हडप केल्या आहेत. ते सगळे मी पुराव्यानिशी समोर आणणार आहे. देवस्थानच्या जमिनी बळकाविण्याचे १७ उहाहरणे आहेत. एका महिलेला त्यांनी अडचणीत आणले आहे. त्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील अनेक देवस्थानांच्या जमिनी या धसांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते यांच्या नावावर केल्या आहेत. देवस्थानच्या ट्रस्टवर हे बेकायदा गेले आहेत, असा आरोपही आजबे यांनी केला.












Click it and Unblock the Notifications