लोकसभेचे मताधिक्य रमेश बोरणारे यांच्यासाठी महत्वाचे! 37 हजारांच्या लीडमुळे विधानसभेला विजयाकडे कूच
Vaijapur Assembly Constituency Ramesh Bornare : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याने शिवसेनेला भरभरून लोकप्रतिनिधी दिले. शिवसेनेच्या माध्यमातून तरुणांचे मोठे संघटन देखील जिल्हा आणि परिसरात उभे राहिले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले शेकडो तरुण राजकारणाच्या परिघात आले. आणि त्यांनी लोकप्रतिनिधी होऊन जनतेच्या विकासासाठी काम केले. महाराष्ट्राचा राजकारणाला फारसे परिचित नसलेले पण पहिल्यांदा विधानसभेत गेलेले शिवसेनेचे वैजापूरचे लोकप्रतिनिधी प्राध्यापक रमेश बोरणारे हे अशा राजकारण्यांपैकी एक आहेत.
2017 साली जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचा विजय झाला आणि ते जिल्हा परिषदेवर गेले आणि अवघ्या दोन वर्षात त्यांना वैजापूर मधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश मिळविले आणि ते विधानसभेत गेले. 2019 पासून चा कालखंड महाराष्ट्राचा राजकारणासाठी फारच गुंतागुंतीचा ठरला. निवडणुकीच्या आधी शिवसेना आणि भाजप अशी युती जनतेच्या समोर गेली होती.

महाराष्ट्राने तब्बल 163 जागा देऊन महायुतीला कौल दिला. पण निकालांच्या दिवशीच शिवसेनेने वेगळे भूमिका घेतली. आणि हा हा म्हणता राजकारणाचा पट पूर्ण बदलून गेला. मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेले भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे फोन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी घेतले नाहीत आणि काँग्रेस राष्ट्रवादीशी वाटाघाटी सुरू केल्या. प्रसंगी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून त्यांचे मन वळविण्यात आले आणि शिवसेना -काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी भलतीच महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्तेत आली.
शिवसेना - भाजपा टोकाचा संघर्ष
2019 नंतरची दोन-तीन वर्षे शिवसेना आणि भाजपाचा प्रचंड संघर्ष झाला. मुंबई महानगरपालिकेत भाजप सत्ते बाहेर बसली होती. राज्यात शिवसेना आणि काँग्रेस अशी युती झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पदावर भाजपचा दावा होता. पण तो दावा देखील महाविकास आघाडीने मान्य केला नाही आणि मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचा सदस्य विराजमान झाला. त्यानंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाला. या संघर्षात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना कारावास देखील भोगावा लागला.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिवसेनेचे अनेक नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आले. खुद्द शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडी तोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्या दबावाकडे दुर्लक्ष केले आणि महाविकास आघाडी रेटून नेण्याचा प्रयत्न केला.
एकनाथ शिंदे यांचे बंड
2022 साली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी आणि आठ मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आणि नंतर शिवसेना पक्ष, शिवसेनेचे चिन्ह आणि मुख्यमंत्रीपद असे सगळेच एकनाथ शिंदे यांच्याकडे चालून आले. एकनाथ शिंदे यांना ज्या बहुतेक आमदारांनी पाठिंबा दिला त्यात रमेश बोरणारे यांचा समावेश होता.
लोकसभेत 37 हजारांचे मताधिक्य
एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणे बोरणारे यांच्यासाठी तितकेसे सोपे नव्हते. उद्धव ठाकरे यांना समर्थन देणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना त्रास दिला. परंतु माझ्या भूमिकेचा निर्णय जनता जनार्दनाच्या दरबारात होईल, असे बोरणारे यांनी स्पष्टपणे सांगितले. आणि वैजापूरच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रचंड निधी खेचून आणला. लोकसभा निवडणूक ही एका अर्थाने एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची कसोटी होती.
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील, उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे सांदिपान भुमरे अशी तिरंगी लढत झाली. काटे की टक्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लढतीत बोरणारे यांच्या वैजापूर मतदारसंघातून संदिपान भुमरे यांना तब्बल 37 हजारांचे मताधिक्य मिळाले आणि बोरणारे यांची विधानसभेची जागा पक्की झाली.
वैजापूरमध्ये अनेक विकासकामे
आपल्या पहिल्याच आमदारकीच्या टर्ममध्ये रमेश बोरणारे यांनी वैजापूर मतदारसंघात अनेक विकास कामे केली. ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि मार्च 2020 मध्ये संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट कोसळले. या आपत्तीच्या काळात सामान्य माणसाला धीर देणे आणि मदत करणे महत्त्वाचे होते रमेश बोलणारे यांनी या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शंभर खाटांचे रुग्णालय उभारून घेतले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना आठ रुग्णवाहिका भेट दिल्या.
साखर कारखान्याचे काम पूर्णत्वाकडे
वैजापूर गंगापूर विधानसभा मतदार संघात 53 आश्रम आहेत त्यापैकी 42 आश्रमांना 23 कोटी रुपयांची मदत मिळवून देण्यात रमेश बोरणारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वैजापूर येथे रामराव नाना नाट्यमंदिर उभारणीत रमेश बोरणारे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या नाट्यगृहाचे उभारणीसाठी तीन कोटी 90 लाखांचा निधी बोरणारे यांनी खेचून आणला. या प्रकल्पाची पायाभरणी नुकतीच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आली.
वैजापूर मतदारसंघात असलेल्या पंचगंगा इंडस्ट्रियल ग्रुप संचलित साखर कारखान्याचा प्रश्न रमेश बोरणारे यांच्या प्रयत्नातून निकाली निघाला आहे. आता हा कारखाना शेतकऱ्यांसाठी खुला झाला असून कारखान्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. वैजापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे सौंदर्यकरण तसेच ग्रामीण भागातील विविध महापुरुषांच्या 75 स्मारकांच्या सौंदर्य करण्यासाठी चार कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी बोरणारे यांनी आपल्या पाठपुराव्याने मंजूर करून घेतला आहे. या कामांचा शुभारंभ देखील उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
मतदारसंघावर वर्चस्व सिद्ध
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा रमेश बोलणारे यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत सांदिपान भुमरे यांना तब्बल 37 हजारांचे मताधिक्य मिळवून देऊन बोरणारे यांनी मतदारसंघावरील स्वतःची पकड सिद्ध केली आहे. विविध विकास कामांच्या माध्यमातून देखील त्यांची लोकप्रियता वाढीस लागली आहे. राज्य शासनाच्या विविध योजना, मतदारसंघावर असलेले वर्चस्व आणि विविध विकास कामे यांच्या जोरावर रमेश बोरणारे सलग दुसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश करतील असा विश्वास यांच्या समर्थकांना वाटत आहे.












Click it and Unblock the Notifications