खळबळजनक : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड; मुक्ताईनगरात वातावरण तापलं
Raksha Khadse : केंद्रीय राज्यमंत्री तथा जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोर मुलांनी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मंत्री रक्षा खडसे या संतप्त झाल्याअसून त्यांनी थेट मुक्ताईनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल करत टाळखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तर सुरक्षारक्षक असून देखील टवाळखोरांची असा प्रयत्न केला. मग सर्वसामान्य मुलींचे काय होत असेल असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
नेमकी काय घडली घटना?
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणांना तातडीने पोलिसांनी अटक करण्याची मागणी रक्षा खडसे यांनी केली आहे. रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात चार युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

कोथळी गावातील यात्रेत घडला प्रकार!
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री रक्षा खडसे यांचे सुरक्षा रक्षक त्यांच्या परिवारासोबत कोथळी गावाची यात्रा बघण्यासाठी गेले होते. यावेळी काही तरुण त्यांच्या परिवाराचे चित्रण करत असल्याचा संशय आला. या संशयावरून त्यांनी या तरुणाच्या हातामधील मोबाईल हस्तगत करून त्याची पडताळणी केली. या घटनेचा राग येऊन चारही तरुणांनी सुरक्षा रक्षकासोबत झटापट झाल्याची माहिती मिळत आहे. त्याघटनेनंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
रक्षा खडसे आक्रमक, म्हणाल्या-..
छेडखानी करणाऱ्या टवाळखोरांना अटक करावी, अशी मागणी करत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. छेडखानी करणाऱ्या मुलांना लवकरात लवकर अटक करा या मागणीसाठी रक्षा खडसे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. पोलिसांच्या सोबत मंत्री रक्षा खडसे यांनी चर्चा केली. या तरुणांना अटक झालीच पाहिजे. माझं एकच म्हणणे आहे की, इतक्या सुरक्षेतही जर अशा पद्धतीने छेडछाड केली जाते. तर सर्वसामान्य मुलींचा काय होणार? असा सवालही त्यांनी पोलिसांना विचारला.
सुरक्षारक्षकासोबत घातली हुज्जत!
दरम्यान, आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा ही महाशिवरात्री निमित्त भरते. या दिवशी विविध कार्यक्रम असतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या ही येथे फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता, त्यानंतर रक्षा खडसे यांच्या कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली. यावेळी देखील हाच तरुण टवाळखोरांना घेऊन तिच्या पाठीमागे लागला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तो बसला. व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु त्याने सुरक्षारक्षकाशी झटापट केली.
रोहिणी खडसेही आक्रमक, गृहखात्यावर ताशेरे
या सर्व प्रकरणावर आता केंद्रीय गृहमंत्री रक्षा खडसे यांची नणंद तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी देखील भाष्य केले. त्या म्हणाल्या की, केंद्रीय मंत्री असलेल्या महिलेच्या मुलीसोबत असा प्रकार होत असतील तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महिला भगिनींना न्याय कसा मिळणार? केंद्रीय मंत्र्यांना दोन दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते.
गृहखातं अपयशी ठरलं, गुन्हेगारांना पाठिशी घातलं जातंय
रोहिणी खडसे म्हणाल्या की, या सर्व प्रकरणावरून समोर एकच लक्षात येतं की, महिला सुरक्षेसाठी गृह खाते हे अपयशी ठरलेलं आहे. पोलीस यंत्रणा कुठल्या दबावाखाली आहे? पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा काम करत आहे का? दोन दिवसापासून केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या गुन्हेगाराला अटक झालेली नाही.












Click it and Unblock the Notifications