फडणवीसांमुळे पाकिस्तानचे पाप जगासमोर! भाजपच्या बड्या नेत्याचा दावा!
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ज्येष्ठ विधीज्ञ उज्जवल निकम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आपण पाकिस्तानचे पाप जगासमोर सिद्ध करू शकलो, असे निकम यांनी केले. एका मुलाखतीत निकम यांनी 26/11 हल्ला आणि कसाबच्या फाशीबाबत महत्त्वाचे विधान करताना देवेंद्र फडणवीसांच्या कामगिरीवर भाष्य केले.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उज्वल निकम यांनी फडणवीसांबाबत केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. भाजप नेते विनय सहस्रबुद्धे यांनी 'नक्की काय चाललंय?' या मुलाखत सत्रात काही नेत्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचीही मुलाखत घेण्यात आली.

नेमके काय म्हणाले उज्ज्वल निकम?
नोकरशाही गोंधळलेली असताना देवेंद्र फडणवीसांच्या निर्णायकतेमुळे आपण काही गोष्टी सिद्ध करू शकलो, असे निकम म्हणाले. पुढे म्हणाले, मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी डेव्हिड हेडलीला साक्षीदार करून त्याची जबानी घेण्यास तत्काळ मान्यता दिली. त्यामुळे कसाबला फाशी होऊन 26/11 च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचे षडयंत्र असल्याची जी बाब आपण जगाच्या वेशीवर टांगू शकलो नव्हतो. ती त्यांच्या काळात न्यायालयात व्यवस्थित सिद्ध करून पाकिस्तानचे पाप आपण जगासमोर निर्विवादपणे उघड करू शकलो, असे निकम यांनी यावेळी नमूद केले.
माझ्या सूचनांवर तत्काळ निर्णय घेतले गेले
उज्ज्वल निकम म्हणाले- नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनीही कायम दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. मी भाजपमध्ये नसतानाही दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याच्या विषयात मला माझ्या सूचनांवर नेहमीच तत्काळ आणि योग्य निर्णय घेतले. राष्ट्र-प्रथम ही मानसिकता असलेले नेतृत्व सत्तेत असल्यावरच अशी निर्णय क्षमता दिसून येते, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
निकम यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव
उज्ज्वल निकम यांनी भापजच्या तिकीटावर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला होता. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूकीत महाविकास विरुद्ध महायुती असा थेट सामना झाला. महायुतीकडून खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून प्रख्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले उज्जवल निकम यांना मैदानात उतरवण्यात आले होते. मतमोजणीवेळी सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपचे उज्ज्वल निकम आघाडीवर होते. मात्र, अखेरच्या फेरीत वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला.












Click it and Unblock the Notifications