मोठी बातमी: उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच लिफ्टमध्ये प्रवास
मुंबई : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला आजपासून मुंबईत सुरूवात झाली आहे.पावसाळी अधिवेशनापुर्वी विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली होती. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी घोळ यावर सरकारला घेरण्यासाठी विरोधक तयार आहेत.

मात्र आज अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी एक वेगळेच पण सुखद चित्र पाहायला मिळाले. सत्ताधारी आणि विरोधकांनी विधानभवनात एकाच लिफ्टने प्रवास केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच वेळी लिफ्टजवळ येऊन थांबले होते. त्यांनी तळमजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी एकाच लिफ्टमध्ये प्रवास केला आहे. त्यावेळी उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान माध्यमांनी उद्धव ठाकरे यांना भेटीबद्दल विचारलं असता त्यांनी लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी विचार करावा, असं सूचक विधान केलं. तसंच डोळा मारला का? असं विचारलं असता उद्यापासून गॉगल घालतो असं उध्दव ठाकरे म्हणाले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि दानवे यांना भलं मोठं चॉकलेट दिलं.यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना विजयाच्या ॲडव्हान्स शुभेच्छा दिल्या.
अनिल परब पदवधीरमधून विधान परिषदेची निवडणूक लढवत आहेत.त्यांच्याविरोधात भाजपाकडून किरण शेलार उभे आहेत. या निवडणुकीचा निकाल 1 जुलैला जाहीर होणार. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचे अगोदरच अभिनंदन केल्याने आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
अधिवेशन आहे आणि विधानसभेमध्ये आमदारच असतात आणि त्याच्यामुळे योगायोगानेच भेट झालेली आहे. त्याचा कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. ही भेट योगायोगाने झालेली आहे ,असं भाजपा नेते अतुल भातखळकर म्हणाले आहेत.












Click it and Unblock the Notifications