Big New: प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मोबदला अन् त्यांच्या मुलांना नोकरी! उद्योगमंत्र्यांची घोषणा
छत्रपती संभाजीनगर - उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची शासनाची भुमिका आहेच. आहे त्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जाईल शिवाय आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कंपनीमार्फत कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिकांना नोकरीत सामावून घेतले जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.
जिल्ह्यातील बिडकीन एमआयडीसी साठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आर्थिक मोबदला देण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ, ही सगळी प्रकरणे 17 ऑगस्टलो मंत्रालयात पाठवावी,असे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले.

बिडकीन औद्योगिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात आज उद्योग मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरेंसह प्रकल्पग्रस्त शेतकरी व अन्य नेते उपस्थित होते.
काय म्हणाले उदय सामंत?
सामंत यांनी निर्देश दिले की, जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांपैकी वर्ग 2 जमिनीचा मोबदला 70 टक्के देण्यात आला आहे. उर्वरित मोबदला न दिलेल्या 225 प्रकरणांपैकी 75 प्रकरणात मोबदला देण्यात आला आहे. शिल्लक 150 प्रकरणे संकलित करुन जिल्हा व विभागस्तरावरील मान्यता घेऊन 17 ऑगस्टरोजी शासनाकडे पाठवावे. शासनस्तरावरून लवकरात लवकर निर्णय होऊन शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत कार्यवाही होईल,अशी ग्वाहीही सामंत यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी!
सामंत म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या म्हणून तेथे इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येऊ शकली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याकडे शासनाची भुमिका आहे. याच शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शैक्षणित पात्रतेप्रमाणे नोकरी देण्यास प्राधान्य असेल. शिवाय तशी शैक्षणिक पात्रता नसली तरी उद्योग त्यांना लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण देतील आणि त्या उमेदवारांना नोकरीत सामावून घेतले जाईल,असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
शेतात ये-जा करायला अडचण येणार नाही
बिडकीन येथे एक सभागृह बांधणे, औद्योगिक वसाहतीच्या सिमेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात येण्या जाण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने रचना करणे, कौशल्य प्रशिक्षणासाठी कन्व्हेंशन सेंटर इत्यादी आश्वासनेही सामंत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.












Click it and Unblock the Notifications