उद्धव ठाकरेंवर आली अबू आझमीचा प्रचार करण्याची वेळ; मराठी माणसात पसरली संतापाची लाट
Maharashtra Assembly Election 2024 : ज्या मुस्लिम नेत्याने स्व. बाळासाहेबांना 'म्हातारा' म्हटले होते. हिंदूबद्दल बरळणाऱ्या या नेत्याबद्दल स्वतः बाळासाहेबांनी सामनाच्या संपादकीय लेख लिहीत चिरफाड केली होती. त्याच मुस्लिम नेत्याचा प्रचार करण्याची वेळ सध्या शिवसेना नेते उद्धव ठाकरेंवर आली आहे.
मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार व समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीला उभे आहेत. यावेळी ते केवळ समाजवादी पार्टीचे उमेदवार नसून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. याच अबू आझमीचा प्रचार सध्या स्वतः उद्धव ठाकरे व त्यांची शिवसेना करताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी मानखुर्दच्या पीएमजीपी कॉलनीमधील शिवसेनेच्या शाखेला अबू आझमी यांनी भेट दिली. यावेळी शिवसैनिकांनी अबू आझमी यांचं जंगी स्वागत केलं. या प्रकारानंतर मात्र महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला.

उद्धव ठाकरेंची मांडीला मांडी
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत बसून अबू आझमी यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मानखुर्दमधील शिवसैनिकांचा गेल्या दोन दशकांपासून अबू आझमींबरोबर संघर्ष चालू आहे. असं असतानाही यावेळी अबू आझमी हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यामुळे येथील शिवसैनिकांनी (ठाकरे) अबू आझमींचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी ग्रँण्ड हयात हाँटेलात महाविकास आघाडीच्या बैठकीतही उद्धव ठाकरे व खा. संजय राऊत हे अबू आझमींच्या मांडीला मांडी लावून बसले होते. स्व. बाळासाहेब ज्या माणसाला जवळ उभं करत नव्हते त्या माणसाच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ सध्याच्या शिवसेनेवर आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
सपा-शिवसेनेत १५ वर्षांपासून वाद
शिवसेना व समाजवादी पार्टीत गेल्या १५ वर्षांपासून वाद आहे. अबू आझमींनी हिंदूंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर २००९ साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सामनातून आझमींचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर अबू आझमींनी, "बाळासाहेब ठाकरे हे चिंतेत सापडलेला माणूस आहे. त्यांना मराठी माणसांचा एवढा राग आहे की त्यांना महाराष्ट्रात मरायचे नाही असे ते म्हणतात. माणसे म्हातारी झाली की मुलांसारखी वागू लागतात, असं आक्षेपार्ह विधान पुन्हा केलं होतं. त्यानंतर पुन्हा शिवसैनिक व अबू आझमी यांच्यात वाद पेटला होता.
आझमींनी वारंवार केली होती टिका
अबू आझमींनी स्व. बाळासाहेबांवर यापूर्वी अनेकदा टिका केली होती. त्यांची वेळ संपली आहे. ते आता म्हातारे झाले आहेत. त्यांनी निवृत्ती घ्यावी, असा सल्ला अबू आझमींनी स्व. बाळासाहेबांना दिल्यानंतर शिवसैनिक व मनसेसैनिक आक्रमक झाले होते. विधानभवन परिसरात त्यांची गाडी अडवून धमकीही दिली होती. शिवाय हिंदीतून शपथ घेतल्यावर मनसेच्या आमदार स्व. रमेश वांजळे यांनी अबू आझमीला मारहाणही केली होती. तेव्हापासून शिवसैनिकांत अबू आझमींबाबत प्रचंड संताप असताना आता उद्धव ठाकरे व त्यांचे कार्यकर्ते अबू आझमींच्या प्रचारात दिसत असल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
ठाकरेंनी लाचारी केल्याची टिका
अबू आझमी व समाजवादी पार्टीचा प्रचार करण्याची वेळ सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकावर आली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे लाचार असल्याची टिका अनेकदा केली आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक अबू आझमीचा प्रचार करताना व अबू आझमी थेट शिवसेना कार्यालयात येऊन शिवसैनिकांना मार्गदर्शन करतानाच्या बातम्या आल्यानंतर शिवसैनिकात प्रचंड रोष पसरल्याचे दिसत आहे. कोणत्याही मराठी माणसाला हा प्रकार आवडलेला नसल्याच्या चर्चा आहेत. या प्रकाराचा येणाऱ्या विधानसभेला उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications