SIT पथकातून 'त्या' तिघांना हटवलं; विरोधकांच्या आक्षेपानंतर मोठं पाऊल, वाचा काय-काय झालं...
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. या हत्येच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटी पथकातील तिघांना काढण्यात आल्याची माहिती आज समोर आली. या अधिकाऱ्यांचा मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडसोबत फोटो असल्याने त्यांना बाहेर कढण्यात आलंय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकमधून काही अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आल्याने पुन्हा चर्चा वाढली आहे. कालच याबाबत आ. जितेंद्र आव्हाड, खा. बजरंग सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्षेप नोंदवला होता.

तपासावर व्यक्त केला संशय
SIT मधील एपीआय महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला होता. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तपास निष्पक्षपणे होणार नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. याबाबत ट्विटही करण्यात आलं होतं. असंच ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही केलं होतं. खा. बजरंग सोनवणे यांनीही यावर आक्षेप घेतला होता. या सर्व ट्विटची काल दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती.
कोणत्या अधिकाऱ्यांना काढलं
वाद वाढल्यानंतर आता एसआयटी टिममधील एपीआय महेश विघ्ने, हवलादार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला हटवण्यात आलं आहे. बीडची स्थानिक गुन्हे शाखा या हत्या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यानीच 5 आरोपींना अटक केली आहे. तर, कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. त्याला आज रात्रीपर्यंत पकडण्यात येईल, असा दावा केला जातोय.
SIT होते सहा अधिकारी
सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणाचा तपास करण्यासाठी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह झोनवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, सहायक फौजदार तुळशीराम जगताप, हवालदार मनोज वाघ यांचा समावेश होता. मात्र, विघ्नेसह काही कर्मचाऱ्यांचे सरपंच हत्येतील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले. विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरला. अखेर एपीआय महेश विघ्ने, हवालदार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला एसआयटीमधून काढण्यात आलं आहे.












Click it and Unblock the Notifications