विनोद तावडे-हितेंद्र ठाकुरांमध्ये राडा, पत्रकार परिषद निवडणूक आयोगानं रोखली, आता...
Maharashtra Assembly Election 2024- मतदानाला काही तास शिल्लक असतानाच नालासोपाऱ्यात चांगलाच वाद पेटला. नालासोपारा मतदारसंघाचे भाजप उमेदवार राजन नाईक आणि विनोद तावडे हे विवांत हॉटेलमध्ये भेटले. यावेळी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर हे विवांत हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसह पोहोचले. विनोद तावडे पैशांच्या वाटपासाठी 15 कोटी रुपये घेऊन आले, असा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला. क्षितीज ठाकूर यांनी पैशांचे बंडल देखील यावेळी दाखवले. तसेच विनोद तावडे यांच्याकडे डायरी आणि लॅपटॉपदेखील असल्याचा आरोपही करण्यात आला.

गोंधळानंतर होती एकत्रित पत्रकार परिषद
नालासोपाऱ्यातील विवांता हाँटेलमध्ये सुमारे साडेतीन तास मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि विनोद तावडे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेण्याची तयारी केली. पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने आदेश देत, ही पत्रकार परिषद थांबवली. हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर हे दोन्ही नेते उमेदवार असल्याने त्यांना पत्रकार परिषद घेता येणार नाही, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं. त्यामुळे ती पत्रकार परिषद तिथेच थांबली आणि ठाकूर पिता-पुत्र हॉटेलमधून बाहेर पडले.
हितेंद्र ठाकूर यांचे गंभीर आरोप
बविआ कार्यकर्त्यांनी तावडेंचा व्हिडिओ शूट करत त्यांना रोखून धरलं, त्यामुळे विनोद तावडे जवळपास तीन तासांपासून हॉटेलमध्येच अडकून पडले. भाजप नेत्यांनीच आपल्याला यासंबंधी टिप दिल्याचा दावा ठाकूर यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तावडेंचा ठरवून गेम झाल्याची चर्चाही झाली. हे पैसे हितेंद्र ठाकूर यांचे आहेत, असा उलटा दावा करु नका, अशी मिश्कील टिपणी यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी केली. ते म्हणाले, पैसे माझे असतील, तर मला देऊन टाका, मला कामधंद्याला तरी होतील. विनोद तावडे यांना लाज वाटायला पाहिजे. माफ करा जाऊन द्या, असं म्हणत त्यांनी मला २५ फोन केले, असा दावाही ठाकूरांनी केला होता.
विनोद तावडे काय म्हणाले?
यावेळी विनोद तावडे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. "निवडणूक आचारसंहितेच्या विषयाच्या दिवशी वोटिंग मशीनची माहिती दिली. आचारसंहितेचा भंग नाही. वास्तव आम्ही सांगितलं. हितेंद्र आप्पांनीही सांगितलं. आता निवडणूक आयोग आणि पोलीस काय ते करतील. कार्यकर्त्यांना मतदान कसं करायचं हे सांगण्यासाठी आलो होतो. निवडणूक आयोगाने आरोपांची चौकशी करावी", अशी भूमिका विनोद तावडे यांनी मांडली.












Click it and Unblock the Notifications