अक्षय शिंदे, अखिलेश शुक्ला आणि आता विशाल गवळीचं वकीलपत्र; धमकीमुळे 'हे' वकील आले चर्चेत
कल्याण येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी अटक केली. आता याच विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी आपल्याला धमकी येत असल्याचा दावा केला आहे. याबाबत वकील संजय धनके यांनी नुकतीच कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय म्हणाले संजय धनके?
संजय धनके यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मी बदलापूर अल्पवीय मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं वकीलपत्र घेतलं होतं. तेव्हाही मला सामाजिक कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्या होत्या. शेवटी संविधानाने सर्वांना समान अधिकार दिला आहे. जोपर्यंत आरोपीवर गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो निर्दोष असतो. मी वकीलपत्र घेतल्यावर मला धमक्या देण्यात आल्या. अखिलेश शुक्ला यांच्या बाबतीतही मला धमक्या देण्यात आल्या होत्या.
'या' वादग्रस्त प्रकरणात होते वकील
वकील संजय धनके हे वादग्रस्त प्रकरणात आरोपींचे वकीलपत्र घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं वकीलपत्र घेत केस लढली होती. त्यानंतर कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला याचं वकीलपत्र घेतलं होतं. आता संजय धनके यांनी आरोपी विशाल गवळी यांचं वकीलपत्र घेतलं आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांना धमकी दिली जात असल्याचा दावा संजय धनके यांनी केला आहे.
पोलिसांचा तपास सुरु
वकील संजय धनके यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मला यापूर्वीही अनेकदा धमक्या आल्या आहेत. आता महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास सुरु केला आहे. धनके हे आरोपींचे वकीलपत्र घेत असल्याने त्यांना वारंवार धमक्यांचे फोन सुरु झाले आहे. आता पोलिस या प्रकरणाचा कसा तपास करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications