राजन साळवींसह दोन माजी आमदार ठाकरे गटाला करणार जय महाराष्ट्र? शिंदे गटात प्रवेशाची तारीखही ठरली?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या पक्षबदलाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. यापूर्वी साळवी यांनी पक्षबदलाच्या चर्चा या अफवा असल्याचे अनेकदा सांगितले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून येत्या १३ फेब्रुवारीला ते शिंदे गटात प्रवेश करतील, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे साळवी यांच्यासोबत ठाकरे गटाचे दोन माजी आमदारही शिंदे गटात प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

साळवींच्या नाराजीच्या चर्चा
राजन साळवी हे ठाकरे गटाचे कोकणातील मोठे नेते आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र वेळोवेळी त्यांनी या चर्चा अफवा असल्याचे सांगितले होते. आता काही मिडिया हाऊसच्या म्हणण्याप्रमाणे, राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी राजन साळवींनी 10 तारखेऐवजी १३ तारखेला प्रवेश करण्यासंदर्भात चर्चा केल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दोन माजी आमदारांच्याही चर्चा
राजन साळवी यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते व माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम हे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे सुभाष बने आणि गणपत कदम यांनी काल ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर या दोन्ही नेत्यांच्या पक्षबदलाच्या चर्चा रंगल्या. हे तिन्ही नेते एकाच दिवशी पक्षप्रवेश करतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ठाकरे गटाला धक्का
या तिन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का समजला जात आहे. एकनाथ शिंदे हे येत्या 15 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी सुभाष बने आणि गणपत कदम यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यांच्यासोबतच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने देखील मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेणार आहेत. सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात ताकद आहे. तर गणपत कदम हे राजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार आहे.












Click it and Unblock the Notifications