पुन्हा चर्चा! एकनाथ खडसेंनी घेतली देवेंद्र फडणवीासांची भेट; भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला..?
महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा खळबळ उडाली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. खडसे-फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाली. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आले. आता यावर खुद्द एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे.

भाजप चर्चांना उधाण
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा घरवापसी करुन भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत होत्या. मात्र खडसे-महाजन वादानंतर हा पक्षप्रवेश थांबल्याचे बोलले गेले. खडसे यांनीही अनेकदा भाजपात जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आज अचानक खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली.
काय म्हणाले खडसे?
देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत मीडियाशी बोलताना खडसे म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यात सहकारी सूतगिरणी, मुक्ताबाई मंदिराचे विकास काम, अल्पसंख्यांकांचा इंजिनिअरिंग कॉलेज यांसह अनेक विषयांचा समावेश आहे. या निवेदनाला मुख्यमंत्र्यांनी अनुकूल प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. ही पूर्वनियोजित भेट होती. त्यांना मी आधी वेळ मागितली होती. त्यांनी मला वेळ दिल्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो, असे त्यांनी सांगितले.
प्रवेशाच्या चर्चा नाहीच
भेटीत प्रवेशाबाबत राजकीय चर्चा झाली का, या प्रश्नावरही खडसे बोलले. ते म्हणाले, कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. विकासकामांच्या पलीकडे कुठल्याही विषयाची चर्चा झालेली नाही. भाजपमध्ये जाण्याचा कुठलाही विचार नाही किंवा त्या संदर्भात राजकीय चर्चा देखील झालेली नाही. भाजपच्या संदर्भात ज्या चर्चा सुरू आहेत, त्या सर्व अफवा, निरर्थक आहेत असे म्हणत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications