मंत्रिमंडळाचा शपथविधी..! तारीख, वेळ, ठिकाण ठरले; खातीही ठरली.. फक्त 'हाच' काय तो ट्विस्ट
महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या नागपूरमध्ये होणार असल्याचे आता जवळपास फायनल झाले आहे. आता मात्र मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाठवविलेली संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीतून शिक्कामोर्तब होऊन आल्याची माहिती मिळत आहे. उद्या दुपारी नागपूरात संभाव्य मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. याशिवाय महायुतीच्या तिन्ही पक्षांना कोणती खाती मिळतील, हे सुद्धा ठरल्याचे सांगितले जात आहे.

नागपूरात ३३ वर्षांनंतर शपथविधी
यापूर्वी १९९१ साली छगन भुजबळ शिवसेनेतून फुटून सत्तेत सहभागी झाले होते. भुजबळांनी बंड करत काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांच्यासह सात मंत्र्यांचा शपथविधी नागपूरात झाला होता. त्यावेळी तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमाण्यम यांनी नागपूरमध्ये त्यांना शपथ दिली होती. त्यानंतर आता 33 वर्षांनी पुन्हा एकदा नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
राजभवनात तयारी पूर्ण
मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा आता सुटला आहे. उद्या 15 डिसेंबरला नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होऊन, महायुतीतले नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने नागपुरातील राजभवनाच्या लॉनवर सध्या जोरात तयारी सुरू आहे. तत्पूर्वी खातेवाटपात गृह, अर्थ, नगरविकास, महसूल अशा महत्त्वाच्या खात्यांवरून महायुतीत तिढा असल्याची चर्चा होती. अखेर काल 13 डिसेंबरला हा तिढा सुटला असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सागर निवासस्थानी रात्रीत भेट घेतली आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला.
कुणाला कोणती खाती?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते राहणार आहे. याशिवाय महसूल, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, आदिवासी विकास, पर्यटन, वने अशी महत्वाची खातीही भाजपकडे राहणार आहेत. अजित पवार गटाकडे वित्त, सहकार, कृषि, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालकल्याण, अन्न आणि औषध प्रशासन, क्रीडा आणि युवक कल्याण, मदत आणि पुनर्वसन अशी खाती असतील. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, आरोग्य, पाणीपुरवठा, उत्पादन शुल्क, जलसंधारण, पणन, शालेय शिक्षण, सामाजिक न्याय अशी खाती असतील, अशा शक्यता आहेत.
'एवढाच' काय तो ट्विस्ट
महायुतीच्या तिन्ही पक्षातील इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नाराजीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर तोडगा म्हणून महायुतीत उद्या पहिल्या टप्प्यात 34 ते 35 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये भाजपचे 17, शिवसेना शिंदे गटाचे 10 तर अजित पवार गटाच्या 7 जणांचा समावेश असेल. नागपुरात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रिपदं रिक्त ठेवू शकतात, अशी शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications