वारे पठ्ठ्या.! ओपन चॅलेंज देणारा निलंबित PSI रणजीत कासले अखेर जेरबंद, वाचा त्याची वादग्रस्त कारकीर्द
Beed Crime Police : बीडमधील सायबर पोलीस ठाण्यातील निलंबित पीएसआय रणजीत कासले यास अखेर बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केले आहे.
'मला पकडून तर दाखवा' असं ओपन चॅलेंज पोलिसांना देणारा रणजीत कासले काल दिल्लावरुन पुण्यात विमानाने आला. त्यानंतर पुणे विमानतळावर पत्रकार परिषद घेतली. मात्र, तरीही काल त्याला ताब्यात घेण्यात आलं नव्हतं.
मी स्वतःहून पुणे पोलिसांसमोर सरेंडर होणार आहे, असे त्याने खुले पणे सांगितले. परंतु त्याने सरेंडर होण्याआधीच बीड पोलिसांनी त्याला शुक्रवारी पहाटे स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. चला तर जाणून घेऊया, रणजीत कासले याची वादग्रस्त कारकीर्द अन् त्यावर काय आहेत आरोप, अखेर वरिष्ठ पोलिसांना सेवेतून का करावे लागले बडतर्फ, वाचा सविस्तर.

वाल्मीक कराड पॅटर्नची 'पुनरावृत्ती'
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मीक कराड ज्याप्रमाणे काही दिवस गायब होता. त्यानंतर स्वत: पोलिस ठाण्यात दाखल झाला. अगदी तशाच प्रकारचा काहीसा प्रकार निलंबित पीएसआय रणजीत कासले याच्याबाबतही घडला.
कासले फरार असताना त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं नव्हतं. मात्र तो स्वतः दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर आणि त्याने माध्यमांशी संवाद साधल्याच्या काही तासांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या रणजीत कासले याने राजकीय नेत्यांसह पोलीस दलावरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. वारंवार तो त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन लोकांवर गंभीर आरोप करत असे.
रणजीत कासले आणि वादांची मालिका
निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याने हिंमत असेल तर पकडून दाखवा, असे खुले आव्हान महाराष्ट्र पोलिसांना आव्हान दिले होते. मात्र बुधवारी त्याने पोलीस माझेच आहेत, असे म्हणत आपण पुण्यात गुरुवारी सकाळी बीड पोलिसांना शरण येणार असल्याचा व्हिडिओ जारी केला होता.
रणजीत कासलेवर काय आहेत गंभीर आरोप?
रणजीत कासले हा बीड येथील सायबर पोलीस ठाण्यात असताना विनापरवानगी आरोपीला घेऊन गुजरातमध्ये गेला होता. तेथे त्याने पैसे घेतल्याचा आरोप झालेला आहे याची चौकशी करून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी कासलेला 26 मार्च रोजी निलंबित केले होते.
निलंबनानंतर केले गंभीर आरोप?
कासलेचे निलंबन झाल्यानंतर तो काही शांत बसला नाही. त्याने एकापाठोपाठ एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आपले वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर आरोप केले होते. वाल्मीक कराड याच्या एन्काउंटरसाठीही आपल्याला विचारणा झाल्याचा सणसणाटी दावाही त्याने केला होता. असेच व्हिडीओ व्हायरल करत असताना त्याने एका समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केले. या प्रकरणी बीडमधील वकिलाच्या फिर्यादीवरून 14 एप्रिल रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल अन् अटकेची कारवाई
18 एप्रिल 2025 रोजी बीड पोलिसांनी रणजीत कासले याला अटक केली. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 213/25 अंतर्गत एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 (1) (2) अन्वये गुन्हा दाखल झाला. या कलमाअंतर्गत अनुसूचित जाती व जमातींवरील अपमानकारक वागणुकीसाठी कडक शिक्षा होऊ शकते.
पोलिस खात्यातून बडतर्फीचे आदेश
बीड सायबर विभागातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याची अखेर पोलीस खात्यातून बडतर्फी झाली असून, या कारवाईमुळे महाराष्ट्र पोलिस दलात एकच खळबळ उडालेली आहे. रणजीत कासले याने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून थेट धनंजय मुंडे, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत अनेक व्हिडिओ व्हायरल केले होते. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अखेर प्रशासनाला ही कारवाई करण्याशिवाय पर्याय उरला नाही.












Click it and Unblock the Notifications