सुरज चव्हाणांचा रात्रीस खेळ चाले, मध्यरात्री पोलिसांना शरण अन् जामीनही मिळाला, नेमका वरदहस्त कोणाचा?
NCP leader Suraj Chavan on Vijay Ghatge News : लातूरमध्ये शेतकरी संघटनेचे तथा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण अखेर पोलिसांना शरण आला आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, रात्री उशिरा पोलिसांना शरण आल्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला जामीनही मंजूर झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मोठा राजकीय गदारोळ होण्याची शक्यता आहे, कारण लातूर पोलिसांनी सूरज चव्हाण यांना पाठीशी घालत कमालीची गुप्तता पाळल्याचा आरोप होत आहे.

नेमकं काय घडलं?
काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडले होते. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी छावा संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन दिले. यावेळी निवेदनासोबत त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले, ज्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण केली. या घटनेनंतर छावा संघटनेनेही आक्रमक पवित्रा घेतला होता.
सूरज चव्हाण आणि पोलिसांची 'गुप्तता'
या मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाण फरार होता. पोलिसांनी या प्रकरणात अकरा फरार आरोपींपैकी सात जणांना आधीच ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा सूरज चव्हाण स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज चव्हाणसह एकूण १० जण पोलिसांच्या ताब्यात होते. मात्र, रातोरात घडलेल्या घडामोडींमध्ये, रात्री पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला जामीनही मिळाल्याची माहिती समोर आली आहे. लातूर पोलिसांनी या संपूर्ण प्रक्रियेत कमालीची गुप्तता पाळल्याचा आरोप होत आहे, ज्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेने शेतकरी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कोण आहे सूरज चव्हाण?
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या पक्षाचे सध्याचे युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते अजित पवारांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते समजले जातात. एकत्रित राष्ट्रवादीत असताना त्यांनी महाराष्ट्र युवकच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. सूरज चव्हाण हे मूळचे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे रहिवासी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्या १० मध्ये अजित पवारांसोबत जाणारे कार्यकर्ता सूरज चव्हाण होते. २०१९ साली अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतल्यानंतर आमदारांना परत आणण्यात सूरज चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सूरज चव्हाणला मिळालेल्या या तातडीच्या जामिनामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. यावर विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटना काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications