सुप्रिया सुळे पुन्हा अजित पवारांच्या घरी, म्हणाल्या...
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुन्हा अजित पवारांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी गेल्या. लोकसभा निवडणुकीच्या दिवशी सुप्रिया यांनी अजित पवारांचं घर गाठलं होतं. आजही त्यांनी अजित पवारांच्या निवासस्थानी भेट दिली.

दरम्यान, अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांना भेटायला मी आले होते, असं सुप्रिया सुळेंनी तेव्हा सांगितलं होतं. आजही त्यांनी प्रसारमाध्यमांना तेच कारण सांगितलं.
अजित पवार बारामतीतल्या काटेवाडीत राहतात. अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्यांच्या मातोश्री आशाताई पवार हे कुटुंब तेथे राहतं. गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष उभा राहिला. शरद पवारांविरोधात त्यांचे अजित पवारांनी दंड थोपटले. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीतील एक मोठा गट बरोबर घेऊन भाजपसोबत सत्तेत गेले होते. त्यानंतर आलेल्या लोकसभेची निवडणुकीतही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात प्रतिष्ठेची लढाई झाली.
बारामतीत सुप्रिया सुळे विरोधात त्यांची भावजई सुनेत्रा पवार असा सामना रंगला होता. मात्र ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचे घर गाठत त्यांच्या मातोश्री आशाकाकींचा आशीर्वाद घेतला होता. आजही त्यांनी अचानक काटेवाडीतील अजितदादांच्या निवासस्थानी हजेरी लावली.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, काटेवाडीतल्या आमच्या घरी मी आज आले. आशाकाकींची भेट घ्यायला मी या घरी आले होते. मी काकींना नमस्कार केला. सुनेत्रा वहिनींच्या आई तेथे होत्या. त्यांचंही दर्शन घेतलं त्यांना नमस्कार केला. त्यानंतर आता मी निघाले आहे. आशाकाकींनाही आम्ही नमस्कार केला. आता शरद पवारांचा कार्यक्रम असल्याने मी निघाले आहे. काटेवाडतीलं हे घर शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचं घर आहे. इथे माझ्या आशाकाकी राहतात. मी जन्मापासून या घरात राहिली आहे. मी आशाकाकींना नमस्कार करायला आले होते, असं सुप्रिया सुळेंनी पुन्हा स्पष्ट केलं.
अजितदादा व सुनेत्रा वहिनींबाबत म्हणाल्या...
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी येथे आशाकाकींना भेटायला आले होते. अजित पवार आणि सुनेत्रा पवार जेवणाच्या कार्यक्रमात व्यग्र होते. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. सगळे गडबडीत होते, त्यामुळे कुणाशी काही चर्चा करायचा काही विषयच आला नाही.












Click it and Unblock the Notifications