'आम्ही एका ताटात जेवलेले लोक..'; झिरवाळांच्या मदतीला सुप्रिया सुळे धावल्या, सरकारवर डागली टीकेची तोफ
Supriya Sule on Narahari Zirwal : राज्याच्या राजकारणात सध्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धाड टाकून एका लिपिकाला रंगेहात अटक केली. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नरहरी झिरवाळ यांची खंबीर पाठराखण केली आहे. झिरवाळ हे कष्टातून वर आलेले नेते असून, मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली त्यांच्याच मंत्र्यावर झालेली ही कारवाई धक्कादायक असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

मंत्रालयातील 'त्या' कारवाईने खळबळ
मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर असलेल्या नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंग याने ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील ३५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीने त्याला रंगेहात पकडले. मंत्रालयासारख्या सुरक्षित आणि सर्वोच्च ठिकाणी अशा प्रकारची कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणानंतर विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
"मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली नेमकं चाललंय काय?"
या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालयावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "मंत्रालय ही एक अशी वास्तू आहे जिथे मुख्यमंत्री प्रमुख असतात. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री बसतात आणि त्याच वास्तूत त्यांच्याच मंत्र्याच्या विभागावर एसीबी धाड टाकते, हे अनाकलनीय आहे. इंग्रजीमध्ये ज्याला 'Under his nose' म्हणतात, तसाच हा प्रकार आहे. ही टीप नक्की कोणी दिली? स्वतःच्याच मंत्र्यावर रेड करून मजला सील करणे हे खूप धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर पारदर्शकपणे उत्तर दिले पाहिजे."
झिरवाळांच्या संघर्षाची सुप्रिया सुळेंना जाण
नरहरी झिरवाळ यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनी तीव्र विश्वास व्यक्त केला. झिरवाळ यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या म्हणाल्या की,
कष्टातून आलेले नेतृत्व : "झिरवाळ साहेब हे काही 'मॅनेजमेंट कोटा'तून आलेले नेते नाहीत. त्यांनी शून्यातून आपले विश्व निर्माण केले आहे. कष्ट करून ते इथपर्यंत पोहोचले आहेत."
संघर्षातील सोबती : "आम्ही एका ताटात जेवलेले लोक आहोत. जेव्हा आमचा संघर्षाचा काळ होता, तेव्हा हे सर्व नेते माझ्या वडिलांच्या (शरद पवार) पाठीशी उभे राहिले. छगन भुजबळ किंवा नवाब मलिक अडचणीत असताना मी त्यांच्या कुटुंबासोबत उभी राहिले, तसेच मी झिरवाळ साहेबांच्या पाठीशीही उभी राहीन."
संस्कारांची शिदोरी : "माझ्या आईने मला संस्कार दिले आहेत की, आयुष्यात कोणी आपल्यासाठी थोडे जरी केले असेल, तरी ते कधी विसरायचे नाही."
सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह
सुप्रिया सुळे यांनी या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, ज्या मंत्रालयाकडे जनता न्यायाच्या आशेने पाहते, तिथेच जर अशा प्रकारे अंतर्गत राजकारण किंवा कारवाया होत असतील, तर ते लोकशाहीसाठी घातक आहे. त्यांनी झिरवाळ यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असून, तिथली नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्याची त्यांची इच्छा असल्याचेही त्यांनी नमूद केले.












Click it and Unblock the Notifications