सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात? रोहित पवारांनी सुनावलं; सुनेत्रा पवारांकडून अखेर स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी नुकतीच दिल्लीत राष्ट्र सेविका समितीच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कार्यक्रमातील सुनेत्रा पवार यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवार पुरोगामी विचारांचे असल्याचा दावा करत असतानाच त्यांच्या पत्नीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कार्यक्रमात हजेरी लावल्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

रोहित पवारांचा अजित पवारांवर 'अप्रत्यक्ष' हल्ला
याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष हल्ला केला आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, "अजित पवार गट एका बाजूला पुरोगामी विचारधारेची आणि यशवंतराव चव्हाण, शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करतो, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे प्रतिनिधी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतील, तर ही दुटप्पी भूमिका आहे."
'त्यांच्यावर दबाव असावा'
रोहित पवार यांनी पुढे असेही म्हटले की, अजित पवार सत्तेत जाण्यामागची कारणे वेगळी असतील, पण त्यांनी संघाचे विचार स्वीकारले असतील असे मला वाटत नाही. कदाचित त्यांच्यावर दबाव असावा. "एखाद्या बैठकीला या, एक फोटो येऊ द्या," अशा प्रकारे त्यांच्यावर दबाव टाकला जात असावा, जेणेकरून 'हेसुद्धा संघाचे विचार स्वीकारायला लागले आहेत,' असा संदेश लोकांमध्ये जाईल, असा आरोप रोहित पवारांनी केला.
सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण
या वादावर स्पष्टीकरण देण्यासाठी सुनेत्रा पवार यांनीही एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी सांगितले की, "माझ्या उपस्थितीचा कोणताही राजकीय उद्देश नव्हता. खासदार या नात्याने आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून महिला संघटनांचे काम समजून घेण्याची मला उत्सुकता आहे. या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते." त्यांनी माध्यमांना विनंती केली की, त्यांच्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये.
कंगना रणौत यांच्या फोटोमुळे वाद
या वादाला तोंड तेव्हा फुटले, जेव्हा भाजप खासदार कंगना रणौत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले. त्यांनी नमूद केले की, त्यांच्या निवासस्थानी राष्ट्र सेविका समितीच्या महिला शाखेचे आयोजन करण्यात आले होते. याच फोटोंमध्ये सुनेत्रा पवार भाषण करताना दिसत आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.












Click it and Unblock the Notifications