वकील काहीही सांगेल..? आ. सुरेश धसांनीही आता 'आका'चं थेट नावच सांगितलं
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज पोलिसांनी एकूण तीन जणांना अटक केली. त्यात मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांचा समावेश आहे. आज या तिन्ही आरोपींना केज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोर्टातील युक्तीवादात आरोपींच्या वकीलांनी आका म्हणजे, विष्णू चाटे असल्याचे कोर्टाला सांगितले होते. मात्र त्यानंतर आ. सुरेश धस यांनी वकीलांचा दावा खोडत आकाचे थेट नावच सांगितले.

कोर्टात नेमके काय झाले?
तिन आरोपींना आज केज न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा आरोपींच्या वकीलांनी व पोलिसांनी युक्तीवाद केला. पोलिसांनी आरोपींना खूनाबाबत काहीच वाटत नसल्याचे सांगितले. आरोपींना पंधरा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी कोर्टासमोर केली. दुसरीकडे आरोपींच्या वकीलांनी पोलिसांचा दावा खोडून काढला. शिवाय वारंवार उल्लेख होणारा आका-आका नेमका कोण हेही सांगितले. आरोपींच्या वकीलांनी आका म्हणजे दुसरा-तिसरा कुणी नसून विष्णू चाटे हाच आका असल्याचं कोर्टाला सांगितलं.
सुरेश धस काय म्हणाले?
आरोपींच्या वकीलांना विष्णू काटे हाच आका असल्याचं सांगितल्यावर आ. सुरेश धस यांनीही पत्रकारांना या प्रश्नाचं उत्तर दिलं. ते म्हणाले, आरोपीचा वकील काहीही सांगेल... आरोपींच्या वकीलांनी जो युक्तीवाद केला, त्याचं उत्तर मी का द्यायचं..? मी ज्या आकाचा उल्लेख केला आहे, तो सगळ्या दुनियेने ओळखला आहे. वाल्मिक आण्णा कराड हाच येथील आका आहे, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं.
धनंजय मुंडेबाबतही बोलले
सुरेश धस धनंजय मुंडे यांच्याबाबतही बोलले. ते म्हणाले, आरोपींना शंभर टक्के मोक्का लागणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे सांगितले आहे. जोपर्यंत संतोष देशमुखांच्या आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत जनतेच्या मनात असंतोष राहणारच आहे. धनंजय मुंडे यांनी हे कृत्य केलेय असं मी म्हणतोय का..? मात्र लोकांच्या नजरेतून संशयाची सुई त्यांच्या बाजूने जाते. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्री ठेवू नका, त्याच्याऐवजी प्रकाश दादांना मंत्री करा, असंही सुरेश धस यांनी म्हटलं.












Click it and Unblock the Notifications