मोठी बातमी..! फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु; सीआयडीकडून एका नेत्याचीही चौकशी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज चांगल्याच घडामोडी पहायला मिळाल्या. या हत्येला वीस दिवस होऊनही काही आरोपी अद्यापही फरार आहेत. मोर्चानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. आज या कारवाईला सुरुवात झाली. तसेच सीआयडीने बीड जिल्ह्यातील राष्टरवादीच्या एका मोठ्या नेत्याची चौकशी केली.

मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरु
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात सुदर्शन चंद्रभान घुले (26 वर्ष, रा. टाकळी) कृष्णा शामराव आंधळे (27 वर्ष मैंदवाडी ता. धारूर), सुधीर सांगळे (रा. टाकळी) अशी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची नावे आहेत. हे तिघे फरार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी आदेश दिल्यानंतर या फरार आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरु झाली. या आरोपींची सपत्ती कोठे-कोठे आहे, याचा शोध आजपासून सुरु झाला. ही मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.
विरोधी पक्षाचा आरोप
मोर्चादरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आकाचा बाप कोण आहे, हे सगळी जनता सांगते. मग आकाच्या बापाला मंत्रीमंडळात का ठेवलंय, असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला होता. दुसरीकडे खा. बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे सत्यवादी असतील तर त्यांनी राजीनामा फेकून चौकशीला सामोरं जावं, असं थेट आव्हान दिलं होतं.
राष्ट्रवादीच्या नेत्याची चौकशी
दरम्यान, आज संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे यांची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्यासह आणखी तीन जणांची चौकशी सुरू आहे. मात्र सीआयडीकडून या चौकशीबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे. चौकशी नेमकी कशासंदर्भात केली जात आहे, हे अद्याप समोर आलेलं नाहीये.


Click it and Unblock the Notifications
