प्रवाशांची बल्ले-बल्ले..! दिवाळीत होणारी एसटीची भाडेवाढ यंदा रद्द, शिवाय हे महत्त्वाचे निर्णयही झाले
दिवाळी व इतर सणाच्या काळात एसटी महामंडळाकडून दर वर्षी भाडेवाढ केली जाते. अंदाजे १० टक्के भाडेवाढ होते, असा इतिहास आहे. मात्र, यावर्षी महामंडळाने मोठा निर्णय घेत जाहीर केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द केली आहे. २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान एका महिन्यासाठी महामंडळाने एसटीची भाडेवाढ लागू केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. महामंडळाने भाडेवाढ रद्द करत एसटीच्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.
एसटी महामंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
दिवाळी व इतर सणाच्या वेळी एसटी महामंडळ भाडेवाढ करते. या भाडेवाढीला हंगामी भाडेवाढ म्हटले जाते. यावर्षीही 25 ऑक्टोंबर ते 24 नोव्हेंबर या एक महिन्याच्या कालावधीत एसटी महामंडळाने 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला होता. मात्र यावर्षी गर्दीचा हंगाम पाहता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला मिळणारी अतिरिक्त रक्कम यंदा मिळणार नाही. या निर्णयाचा राज्यभरातील प्रवाशांना फायदा होणार आहे. या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार होता. जिथे पाचशे रुपये तिकीट लागायचे ते तिकीट साडेपाचशे लागणार होते. परंतु, आता एसटीच्या तिकीटाचे दर 'जैसे थे' अवस्थेत राहतील. यामुळे राज्यातील लाखो प्रवाशांची दिवाळी आणखी गोड होणार आहे.

शिवनेरी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी'
विमान प्रवासात प्रवाशांच्या सेवेसाठी विमान सुंदरी असतात. आता याच सुंदरींची भरती एसटी महामंडळातही होणार आहे. मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेप्रमाणेच शिवनेरी सुंदरी अर्थात परिचारिका येणार आहेत. या आदरादिथ्य आणि व्यवस्थापनाची सेवा प्रवाशांना देतील. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना ही सेवा दिली जाणार आहे. प्रवाशांना चांगली व गुणात्मक सेवा देऊन एसटीचा दर्जा उंचावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. गेल्या आठवड्यात एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीत ही घोषणा केली.
बस स्थानकांवर महिला बचत गटांना जागा
एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर आता महिला बचत गटांना स्टाँलसाठी जागा देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. बसस्थानक ज्या गावात असेल त्या परिसरातील महिला बचत गटांना त्यांचे पदार्थ विकण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन १०X१० आकाराचा हा स्टॉल उपलब्ध करून दिला जाणार आहे. उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.












Click it and Unblock the Notifications